गुजरातमध्ये सरदार सरोवरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सुमारे ६०० फुटांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचा निश्चय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असतानाच मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने मोदी यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या स्मारकाचे आराखडे २००९च्या निवडणुकीपूर्वी तयार करण्यात आले, तर आता १०० कोटींची तरतूद करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्देश स्पष्ट होतो.
न्यूयॉर्कमधील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षा ३०० फूट उंचीची सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. मोदी किंवा गुजरात सरकारपेक्षा आम्ही कमी नाही हे दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांचा त्यापेक्षाही उंच पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा उभारला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. स्मारकाचे आराखडे तयार करणे, पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
अरबी समुद्रात राजभवनजवळील खडकावर स्मारक उभारण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी अद्याप पर्यावरण परवानगी मिळालेली नाही हे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले. तरीही सरकारने १०० कोटींची तरतूद करण्यात आली. यापूर्वी काही वर्षांंपूर्वी अर्थसंकल्पात या स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.
२००९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्मारकाचे संकल्पचित्र सादर करून मते मिवविण्याचा प्रयत्न केला होता. आता हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन १००कोटींची तरतूद करण्यात आली. एकूणच मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशानेच हे सारे करण्यात येत असल्याची चर्चा आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करून मतदारांना खुश करण्याचा आतापर्यंत सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहिला आहे.
समुद्रात खडकावर १६ हेक्टर्स जागेवर स्मारक उभारण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळण्यास आणखी किती कालावधी लागेल याबाबत काहीच अंदाज नाही. निवडणुकीच्या तोंडावर स्मारकाचा मुद्दा चर्चेत राहील याची खबरदारी सरकारने घेतली आहे.