राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी करोनाची लस घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. करोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही करोनाची लस घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना लसीकरणासंदर्भातील संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे यासाठी राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेत लसीकरण केलं पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पुढाकार घेत लसी टोचून घेतली आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लस घेतली त्यावेळी डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. उद्धव यांच्यासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांपैकी रश्मी ठाकरेंच्या आई मीनाताई पाटणकर यांनीही करोना लसीचा पहिला डोस घेतला. उद्धव यांनी लस घेतली तेव्हा ठाकरे कुटुंबियांबरोबरच  डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशीही उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray take a covid vaccine scsg
First published on: 11-03-2021 at 13:10 IST