मुंबई : इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्टला होणार होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असल्याने निवडणूक कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाशिवाय या निवडणुका नकोत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता. या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात १२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीतही राज्य सरकारने या निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली होती. ओबीसी आरक्षणाबाबतचा समर्पित आयोगाने दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून, त्यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election commission postponed municipal elections zws
First published on: 15-07-2022 at 03:04 IST