मुंबई : सणोत्सव व सुट्टय़ांच्या हंगामात पर्यटकांना लुभावणाऱ्या आकर्षक सवलती व पॅकेजेसद्वारे पर्यटन उद्योगाला मंदीछाया दूर सारून चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. मुंबईत ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम फेअर (टीटीएफ)’ या पर्यटन मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या देशभरातील सहल आयोजक तसेच  हॉटेलचालकांना मुंबईतील पर्यटकांकडून विशेष अपेक्षा आहेत.

अहमदाबाद आणि सुरतमधील यशस्वी आयोजनानंतर टीटीएफ मेळ्याचे वरळीतील नेहरू सेंटर येथे १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी आणि हिवाळी सुट्टय़ांच्या पर्यटन हंगामावर लक्ष केंद्रित करत या मेळ्यामार्फत मुंबईतील ग्राहकांशी थेट भेटीतून चांगल्या व्यवसाय संधींच्या अपेक्षेने १५० हून अधिक सहल आयोजकांनी येथे दालने थाटली आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन मेळ्यात राज्य पर्यटन मंडळे, राष्ट्रीय पर्यटन कार्यालये, हॉटेल चालक, एअरलाइन्स, टूर ऑपरेटर व ट्रॅव्हल एजंट्स, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या, रेल्वे व क्रूझ लाइन्स एकाच छताखाली आल्या आहेत.

अनेकांनी १५ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देणारी पॅकेजेस आणली असून, थेट त्या क्षणी आरक्षणही ग्राहकांना करता येईल, असे टीटीएफचे आयोजक जी. इब्राहिम यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थव्यवस्थेचे मंदावलेपण हे प्रत्यक्ष असण्यापेक्षा भावनिक परिणाम साधणारे आहे, असे नमूद करीत इब्राहिम यांनी या निमित्ताने तारांकित हॉटेलांवर (५,००० रुपयांपेक्षा अधिक भाडे असणाऱ्या) लावण्यात आलेला वस्तू व सेवा करांचा दर न्याय्य पातळीवर आणला जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तीन दिवसांच्या कालावधीमध्ये ३,००० हून अधिक व्यापार प्रतिनिधींनी या  मेळ्याला भेट देणे अपेक्षित असल्याचे इब्राहिम म्हणाले. सामान्य पर्यटनप्रेमींसाठी हा मेळा शनिवारी दुपारपासून विनामूल्य खुला असेल.