राज्य सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सध्या श्रेयवादाचं राजकारण सुरु झालं आहे. कर्जमाफीनंतर शिवसेनेनं आता तर थेट देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला. कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी कुणी देईल काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. सरकारनं ही कर्जमाफी मोकळ्या मनानं आणि दिलदारीनं दिलेली नाही. सरकारमध्ये राहून रोज या प्रश्नावर शिवसेनेनं लाथा घातल्याचा हा परिणाम आहे, असं ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेने निभावलेल्या भूमिकेवर सडेतोड भाष्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारनं तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं आंदोलन तूर्तास थांबलं आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून आम्ही त्यांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचे मनापासून आणि ‘तत्त्वतः’ अभिनंदन करीत आहोत, असे उद्धव म्हणाले. पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रोश केला. संप आणि बंदच्या दणक्यानंतर सरकारनं दडपशाहीचे प्रकार केले, तरी शेतकरी एक राहिला व हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव ठरला, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?…
– नव्या ‘घोषणे’नुसार अल्पभूधारकांचे कर्ज तत्काळ माफ झाले आहे व सरसकट कर्जमाफीस ‘तत्त्वतः’ मान्यता देऊन सरकारने स्वतःच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवून घेतला आहे.
– शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा संपूर्ण सहभाग होता. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले व ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे.
– सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘कॅबिनेट’वर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता. जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण असेच घेणार असाल तर तुमच्याशी आमचं जमणार नाही व तुमच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार आहे.
– आम्ही आता मुख्यमंत्र्यांचे फक्त एकाच गोष्टीसाठी अभिनंदन करीत आहोत ती म्हणजे कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न त्यांनी केला नाही.
– आता ‘कुणी’ याचा अर्थ ‘तत्त्वतः’ शिवसेना व इतर संघटना असाच घ्यायला हवा. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे.
– सरकारने ही कर्जमाफी मोकळ्या मनाने व दिलदारीने दिलेली नाही. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे.
– शिवसेना सरकारमध्ये फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याची ‘हमी’ काही आम्ही देऊ शकत नाही.
– शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती, तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी, अशी आम्ही त्यांना ‘तत्त्वतः’ विनंती करीत आहोत.
– शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ‘तत्त्वतः’ शब्दाच्या रेशमी फासात अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात व उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. तत्त्वतः कर्जमाफीचे निकष सरकारने तत्काळ जाहीर करावेत.
– फडणवीस सरकारच्या काळात ज्या चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचेही सातबारा कोरे करकरीत व्हावेत. शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळावा या मागणीचा रेटा आम्हाला सोडता येणार नाही. या आमच्या मागण्या तत्त्वतः नसून आरपारच्या आहेत.
– शेतकऱ्यांच्या तोंडास पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न झालाच तर गाठ शिवसेनेशीच आहे व शिवसेना आग्या वेताळाच्या भूमिकेत शिरून पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
– या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या-तोटय़ाचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही.
– शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!