केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तेल व वायुसंवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्तम राज्याच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
गेल्या वर्षभरात तेल व वायुसंवर्धनसाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली.
राज्य सरकारने इंधनसंवर्धनासाठी राज्यभर जनजागृती करण्यासाठी वीस ठिकठिकाणी हजारांहून अधिक शिबिरे घेतली. राज्यभरात इंधनसंवर्धनात त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आला. त्यामुळे इतर राज्यांऐवजी महाराष्ट्राला या पुरस्कारासाठी पसंती देण्यात आली. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते तेल व वायुसंवर्धनासाठीचा सर्वोत्तम राज्याचा महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उरण येथील तेल व वायू महामंडळाच्या प्रकल्पाला इंधनसंवर्धनासाठी देशातील सर्वोत्तम आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त संस्थेचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या वर्षी इंधनसंवर्धनासाठी जनजागृतीचा भाग म्हणून देशभर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्यातही अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील नववीत शिकणाऱ्या प्रार्थना रानडे हिला सर्वोत्तम निबंध लेखनासाठी पुरस्कार देण्यात आला होता.