मुंबई: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी सरकारी नोकरीत नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मराठा समाजातील तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून नोकरी देण्याची तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आणखी १०० कोटी रुपयांसह मराठा समाजाच्या बहुतांश सर्व मागण्यांची १५ मार्चपूर्वी पूर्तता करण्याच्या राज्य सरकारच्या लेखी हमीनंतर छत्रपती संभाजी राजे यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण सोमवारी संध्याकाळी मागे घेतले.  मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यात राज्य सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करीत संभाजी राजे यांनी शनिवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. त्यापूर्वीच शुक्रवारी सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागास आयोग स्थापन करण्याबरोबरच समाजाच्या अन्य मागण्या मान्य केल्याची घोषणा केली होती. मात्र सरकार केवळ घोषणा करते, आश्वासनांची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत संभाजी राजेंनी आमरण उपोषण सुरू ठेवले होते.  सोमवारी संभाजी राजेंची प्रकृती खालावत असतानाच सरकारी पातळीवरूनही उपोषण सोडण्यासाठी हालचाली सुरू होत्या.