नदीचे मूळ शोधू नये म्हणतात पण मानवी संस्कृतीची मूळं शोधण्यासाठी नद्यांच्या काठी जाण्यावाचून गत्यंतर नसते. नद्यांच्या काठीच मानवी संस्कृती नांदली, विकसित झाली आणि मग प्रगतीच्या बळावर सुदूर पसरूही लागली. त्यामुळे नद्यांच्या काठाच्या प्रदेशाचा अभ्यास हा पर्यायाने नद्यांच्या काठी विकसित झालेल्या मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठीही फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच राज्य सरकारच्या दर्शनिका अर्थात गॅझेटिअर विभागाने जिल्ह्य़ांप्रमाणेच नदी खोऱ्यांचेही गॅझेट काढण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून त्याचा प्रारंभ ‘प्रवरा खोरे’ या गॅझेटिअरच्या प्रकाशनाने नुकताच झाला आहे.
देशातील अन्य राज्यांमध्ये जिल्ह्यांचे गॅझेटिअर प्रकाशित केले जाते. महाराष्ट्रात आपण जिल्हा गॅझेटिअरबरोबरच नदी खोऱ्याचे गॅझेटिअर प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. नदी खोऱ्यावरील अशा प्रकारचे हे पहिलेच गॅझेटिअर असल्याचे राज्य सरकारच्या गॅझेटिअर विभागाचे संपादक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवरेच्या काठी अश्मयुगीन संस्कृती व प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृती असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. प्रवरा नदीचा उगम सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी आजच्या ठिकाणापेक्षा काही किलोमीटर दूर सह्य़ाद्रीच्या पलीकडे होता, असे इतिहास सांगतो. त्याचा वेध या गॅझेटिअरमध्ये घेण्यात आला असल्याची माहितीही डॉ. पाठक यांनी दिली. या ग्रंथात प्रवरा खोऱ्याची भूशास्त्रीय पाश्र्वभूमी, खोऱ्यातील प्राणीसृष्टी आणि वनसंपदा, सांस्कृतिक जीवन, वन्यसंस्कृती, सामाजिक जीवन, जलव्यवस्थापन आदी माहिती आहे.
या गॅझेटिअरचे प्रकाशन नुकतेच मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. डॉ. शरद मांडे, डॉ. अनुराधा रानडे यांचा ग्रंथाचे लेखक म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट मुद्रणासाठी शासकीय मुद्रणालयाचे संचालक प. ज. गोसावी यांनाही गौरविले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅझेटिअरमधील काही नोंदी
* भंडारदरा धरणाचे काम १९१० मध्ये सुरू. १९२६ मध्ये काम पूर्ण. परिसरातील ६ तालुक्यांमध्ये ७ सहकारी साखर कारखाने
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात सहा मोठी धरणे. १ हजार ७० मीटर उंचीवर प्रवरा नदीचा उगम
* प्रवरा नदीची एकूण लांबी २३० किलोमीटर. या संपूर्ण क्षेत्रात एकूण ३१ लघुप्रकल्प
* प्रवरा खोऱ्यातील दारणा धरणाला ८० वर्षे पूर्ण.
१ लाख, ३ हजार ८७७ हेक्टर इतकी सिंचन क्षमता. खोऱ्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८९६ मिलिमीटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government initiative to published gazette on river valley
First published on: 10-02-2014 at 12:10 IST