मुंबई : राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागांतील वस्त्यावस्त्यांच्या नावांमधून अस्तित्वात असलेली जातींची ओळख पुसून काढण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून, नवीन नावे देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी वस्त्यांची जातीवाचक नावे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने या वस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला होता. राज्यात अनेक ठिकाणी वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या वस्त्यांना आता आता समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहूनगर, क्रांतीनगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.

यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government to rename residential areas having caste based names zws
First published on: 03-12-2020 at 01:37 IST