मंत्री आणि सचिव यांच्यातील विकोपास गेलेले शीतयुद्ध, काही मंत्र्यांनी आपले सचिव बदलण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत उठवलेला आवाज आणि स्वपक्षीय आमदारांच्या नाराजीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री प्रशासनात मोठे फेरबदल केले.
मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असता तरी सनदी अधिकाऱ्यांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे. सचिवांच्या मनमानी कारभारामुळे विभागाच्या आणि सरकारच्या कामावर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी अनेक मंत्र्यांनी केल्या होत्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनात खांदेपालट केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांची एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सामाजिक न्यायविभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांची वस्त्रोउद्योग विभागात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक असलेले आशीषकुमार सिंह यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव म्हणून, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांची सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव सेवा पदावर बदली करण्यात आली आहे. डॉ. भगवान सहाय यांची अप्पर मुख्य सचिव कृषी व पणन, सीताराम कुंटे प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण बिजय कुमार यांची प्रधान सचिव (पदुम), सुधीर श्रीवास्तव यांची अप्पर मुख्य सचिव परिवहन, मिता राजुरोचन यांची प्रधान सचिव वित्तीय सुधारणा, वंदना कृष्णा यांची प्रधान सचिव लेखा व कोशागरे, व्ही. गिरिराज यांची वित्तविभागात बदली करण्यात आली आहे. दीपक कपूर यांची प्रधान सचिव कौशल्यविकास महेश पाठक यांची प्रधान साचिव अन्ननागरी पुरवठा, पी. के देशमुख यांची सचिव ग्रामविकास पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डी. के जैन यांची वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2016 रोजी प्रकाशित
मंत्र्यांच्या नाराजीनंतर प्रशासनात मोठी उलथापालथ सचिवांच्या बदल्या
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांची एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-04-2016 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government transfers minister secretary