गेल्या काही महिन्यांत तुरडाळीचे भाव गगनाला भिडल्यामुळे राज्य सरकारकडून सोमवारी तुरडाळ स्वस्तात रेशनच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे स्वस्त दरदेखील गरिबांच्या खिशाला कितपत परवडतील, याबाबत शंका आहे. सध्या बाजारात तुरडाळीचे भाव २०० रूपये किलोच्या पुढे गेले आहेत. सरकारकडून रेशनच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या डाळीचा दर १२० रूपये किलो इतका असणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबानाच त्याचा लाभ होणार आहे. प्रायोगिक तत्वावर दोन महिन्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. मात्र, १२० रूपये किलो हा दर पाहता सर्वसामान्य या योजनेला कितपत प्रतिसाद देणार, याबाबत शंकाच आहे. गोरगरीबांना डाळ देण्यासाठी ती ई-टेंडरिंगने खरेदी केली जाईल. महिन्याला रेशनिंग दुकानांमधून ८४ कोटी ७४ लाख किलो डाळ वाटप होईल. त्यासाठी ७०० मेट्रिक टन डाळ केंद्रानं उपलब्ध करुन दिली आहे.