मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अमूल, गोकुळ, महानंद, मदर डेअरी, वारणा या पाच नामांकित कंपन्यांच्या दुधाची विक्री येत्या १ मेपासून बंद करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाने घेतल्याची माहिती संघाचे सरचिटणीस अमित भुवड, अनिल आगळे आणि उपाध्यक्ष प्रकाश नायकल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दूध विक्रेत्यांनी या पाच कंपन्यांचे दूध विकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.  
या कंपन्यांकडून विक्रेत्यांना एका लिटरमागे छापील किमतीच्या फक्त अडीच ते तीन टक्के इतके कमिशन दिले जाते. ते वाढवून मिळावे, अशी विक्रेत्यांची मागणी आहे. दूध विक्रेत्यांनी दहा टक्के कमिशन देणाऱ्या दूध कंपनीच्या दुधाची विक्री ही छापील किमतीपेक्षा जास्त दराने केली आणि अशा दूध विक्रेत्यांच्या विरोधात राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र विभागाने कारवाई केली तर त्याला संघटना जबाबदार राहणार नाही, असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.