मुंबई : विधान परिषदेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे भ्रमणध्वनीवर पत्ते खेळत असल्याची चित्रफीत कोणी तयारी केली असावी याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. ही चित्रफीत गेल्या आठवड्यातील आहे. कोकाटे हे भ्रमणध्वनी बाकाखाली ठेवून रमी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. पण कॅमेरात एवढे स्मूक्ष कैद होणे कठीण मानले जाते.
पत्रकार कक्ष वा अधिकारी गॅलरीतूनही चित्रीकरण केले तरी एवढे स्पष्ट दिसू शकत नाही. सभागृहात कोकाटे यांच्या आजूबाजूला बसलेल्या कोणी तरीच हे चित्रीकरण केले असण्याची शक्यता वर्तविली जाते. कोकाटे यांच्या आजूबाजूला सत्तधारी महायुतीचे आमदार बसले होते. म्हणूनच सत्ताधारी गोटातून कोणी चित्रीकरण करून ती चित्रफीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडे पोहचती केली का, अशीही शक्यता वर्तविली जाते. बाकाखाली भ्रमणध्वनी धरून ते बोटांची हालचाल करीत असल्याचे त्या चित्रफीतीत स्पष्टपणे दिसत आहे. यावरून जवळूनच कोणी तरी त्याचे चित्रीकरण केले असावे.