आठवी, दहावीसह पहिलीच्याही पाठय़पुस्तकात बदल

सत्तापालटानंतर शालेय पुस्तकांची ‘विचारशुद्धी’ करण्याचे कार्य पार पाडण्यासाठी सुरू झालेल्या ‘गृहपाठा’ला फळ आले असून आता यंदा इयत्ता आठवी आणि दहावीप्रमाणेच पहिलीचेही पाठय़पुस्तक नव्याने तयार करण्यात आले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांतच (२०१८-१९) त्यानुसार आठवी आणि दहावीबरोबरच पहिलीची नवी पाठय़पुस्तके बाजारात येणार आहेत, तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी आणि अकरावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार तयार करण्यात आलेल्या पाठय़पुस्तकांची निर्मिती पूर्ण होते, तोच हे नवे धडे गिरवले जात आहेत. राज्यात २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखडय़ानुसार २०१३ पासून नवी पाठय़पुस्तके लागू करण्यात आली. दरवर्षी टप्प्याटप्प्याने एकेका इयत्तेचे पुस्तक बदलण्यात आले. त्यानुसार यंदा आठवी आणि दहावीची नवी पुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र त्याचबरोबर आता यंदाच पहिलीचेही पुस्तक बदलण्यात येणार आहे. सध्या असलेले पहिलीचे पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यात काही बदल करून २०१६ मध्ये पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले. अभ्यासक्रम आराखडय़ानुसार सर्व पुस्तके लागू होण्यापूर्वीच यंदापासून पहिलीचे पुस्तक बदलून पाठय़पुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. पुढील वर्षी (२०१९) इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीची पाठय़पुस्तके बदलणार आहेत.  राज्य पाठय़पुस्तक निर्मिती केंद्राकडून (बालभारती) पाठय़पुस्तक विक्रेत्यांना जुनी पुस्तके बदण्याची विनंती करणारे पत्र बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी पाठवले आहे. जुनी पुस्तके बालभारतीकडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.

एप्रिल २०१६ मध्ये पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत तयार करण्यात आलेली सर्व अभ्यास मंडळे बरखास्त करत एकाच अभ्यास मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्याबरोबर २०१६ मध्ये बालभारतीकडून पाठय़पुस्तकांच्या निर्मितीचे काम काढून ते विद्या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पाचवीपासूनची पुस्तके ही नव्या अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आली होती. गेल्या वर्षी अभ्यास मंडळात बदल करत काही सदस्यांना काढून नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर आता पहिली, दुसरी, तिसरीची पुस्तके बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळ बदलात सातत्य

गेल्या दोन वर्षांत अभ्यासक्रम आणि अभ्यास मंडळात मोठे बदल झाले. सरकार बदलल्यानंतर पहिली ते बारावीची पुस्तके तयार करण्यासाठी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले. मात्र ते मंडळही सर्व पुस्तके बाजारात येईपर्यंत कायम ठेवण्यात आले नाही. सातत्याने अभ्यास मंडळात बदल करण्यात आले. सध्या पहिली, दुसरी, तिसरीची पुस्तके ही यापूर्वीच्या सरकारच्या काळात नेमण्यात आलेल्या पाठय़पुस्तक मंडळाने तयार केली होती.