मुख्यमंत्र्यांचा विश्वास; गुंतवणूकही प्रत्यक्षात आणण्यावर ठाम
महाराष्ट्राशिवाय ‘मेक इन इंडिया’ होऊ शकत नाही, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देशात उद्योगांसाठी राज्याचे स्थान पहिलेच राहील, ’ असा विश्वास व्यक्त केला. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहामध्ये केवळ सामंजस्य करार (एमओयू) करणार नसून प्रत्यक्ष गुंतवणूक आणून दाखवू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. महत्वाच्या पाच गुंतवणूक धोरणांमुळे आणि ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’ मुळे महाराष्ट्रालाच देशीविदेशी गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहामध्ये ‘मेक इन महाराष्ट्र’ साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी, वस्त्रोद्योग, पायाभूत सुविधा, माहिती व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी संधी आहे. कृषी प्रक्रिया उद्योग आणि वस्त्रोद्योगामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. उद्योगांसाठी गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्रालाच राहिली असून देशात पहिले स्थान कायम राहील. उद्योगांना चालना देण्यासाठी परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. ‘मैत्री’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योगांना परवानग्या मिळविण्यासाठी मदत दिली जात आहे व त्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करुन विहित मुदतीत परवानग्या दिल्या जात आहेत.
शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग, मेट्रोचे विविध टप्पे उभारणीसाठी जपानी वित्तीय संस्था जायकाचे सहाय्य मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्टार्ट अप’ योजने अंतर्गत राज्यात प्रयत्न करण्यात येत आहेत. नाविन्यता परिषद स्थापन करण्यात आली असून नवीन संकल्पनांना वाव दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्याच्या सर्व भागांमध्ये उद्योगांना वाव असून दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे मराठवाडय़ाच्या विकासाला चालना मिळणार आहे. मिहान प्रकल्प, संरक्षण व वस्त्रोद्योग यातून विदर्भाच्या विकासाला मदत होईल. लघुउद्योग आणि निर्मिती उद्योगांमुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र व अन्य क्षेत्रांमध्येही उद्योगवाढीला वाव मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. या सप्ताहात महाराष्ट्रात गुंतवणुकीचे किती करार होतील, याचा निश्चित आकडा सांगण्यास नकार देत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत अजून बोलणी सुरु असल्याचे स्पष्ट केले.
सुमारे दोन ते चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार (एमओयू) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण हे करार झाले तरी प्रत्यक्ष गुंतवणूक होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यावर ब्तो त्यांचा आधीच्या सरकारबाबतचा अनुभव असेल, असे प्रत्युत्तर देत आम्ही गुंतवणूक आणून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे ४ लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य
‘मेक इन इंडिया’ सप्ताहा अंतर्गत महाराष्ट्राने ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य राखल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने राज्याचेही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हे स्वतंत्र व्यासपीठ असून या माध्यमातून सहाही दिवस राज्यातील विविध विषय, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. संकुल प्रदर्शनात महाराष्ट्राचे १०,००० चौरस फूट जागेवर स्वतंत्र दालन असेल.