‘दादासाहेब फाळके अकादमी पुरस्कारा’च्या यंदाच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांनी पुरस्कार नाकारला आहे. गेल्या आठवडय़ातच याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत अतिशय उत्साहाने बोलणाऱ्या सिन्हा यांनी हा पुरस्कार नाकारताना आपला अपमान झाल्याचे कारण दिले आहे. पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर आपले नाव आणि आपल्याला मिळणारा पुरस्कार याबाबत उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे आपण प्रचंड नाराज झालो असून हा पुरस्कार नाकारत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
अत्यंत सन्मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याचे कळल्यावर आपल्याला अत्यंत आनंद झाला होता. मात्र पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर याबाबत साधा उल्लेख करण्याचेही सौजन्य दाखवण्यात आले नाही. हा आपला अपमान आहे, असे सिन्हा म्हणाल्या. आयुष्यात आपल्याला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्या पुरस्कारांबाबत आपण समाधानी आहोत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.