४७ कोटींचा खर्च; टेकडीचे भूस्खलन झाल्याने रस्ता दुभंगला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : टेकडीचे भूस्खलन झाल्याने दुभंगलेल्या मलबार हिल येथील एन. एस. पाटकर रस्त्याच्या पुनर्बांधणीला लवकरच सुरुवात होणार असून पालिकेने त्याकरिता निविदा मागवण्याची तयारी केली आहे. सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार या रस्त्याचे काम करण्यात येणार असून त्यासाठी ४७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

५ ऑगस्ट २०२० रोजी मलबार हिलच्या न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गाच्या बाजूला टेकडीचे भूस्खलन झाले. त्यामुळे येथील रस्ताही दुभंगला आहे. या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेने आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समिती नेमली होती. सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी संकल्पचित्रे व निविदा सूचना प्रकाशित झाल्या असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

२३ ऑक्टोबरपर्यंत निविदा उघडण्यात येणार असून निविदा प्रक्रियेअंती कार्यादेश देऊन डिसेंबर २०२० मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील टेकडीची पुनर्बांधणी व भूस्खलानामुळे प्रभावित झालेल्या न्यायमूर्ती सीताराम पाटकर रस्त्याची पुनर्बांंधणी ही कामे सुरू होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रस्त्याचे काम असे होणार…

या रस्त्याचे काम करण्यापूर्वी माती स्थिर (स्टॅबिलाइज) करण्यासाठी खास तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर संरक्षक भिंत बांधून मग प्रत्यक्ष रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या रस्ते बांधणीचा खर्च वाढणार आहे. रस्ते बांधणीचा अपेक्षित खर्च ४७ कोटींचा असून त्यावरील इतर मलनि:सारण कर, परीक्षण कर वगैरे धरून हा खर्च ६२.८४ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malabar hill road tender akp
First published on: 16-10-2020 at 00:47 IST