मुंबई : अनेकदा चोरी करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येतो. मालाडमध्ये दोन आरोपींनी एका लहान मुलाचा चोरीचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी चोरी करायला मुलाला एका बंगल्यात पाठवले होते. ते घर लष्करातील एका कर्नलचे होते. मुलाने घरातील दागिने चोरताना कर्नलचे पिस्तुल देखील उचलून आणले होते. गुन्हे शाखा १२ च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावताना मुलासह दोन आरोपींना अटक केली.
मालाड पूर्वेला आर्मी कॅम्प (लष्करी तळ) वसाहत आहे. तेथे भारतीय लष्करातील अधिकारी राहतात. तक्रारदार हे भारतीय लष्करात कर्नल म्हणून कार्यरत आहेत. ते मालाड पूर्व येथील आर्मी कॅम्प परिसरातील एका बंगल्यात पत्नी आणि १२ वर्षांच्या मुलासह राहतात. या कर्नलची पत्नी दक्षिणेतील सुप्रसिध्द अभिनेत्री देखील आहे. कर्नल सध्या लडाख येथे कर्तव्यावर आहे. त्यांच्या घरात १ नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात प्रवेश करून सव्वा लाखांचे दागिने आणि ३ लाकांची रोख रक्कम तर चोरून नेली.
कर्नलची पत्नी मुलासह जेवण करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी दुपारी दीड ते संध्याकाळी ५ या वेळेत ही चोरी झाली होती. परंतु धक्कादायक बाब म्हणजे कर्नल यांच्या वैयक्तिक वापरासाठी असलेले पिस्तूल (रिव्हॉल्वर) आणि जिवंड काडतुसेही चोरून नेली. त्यामुळे ही चोरी साधीसुधी नसल्याचा संशय पोलिसांना आला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे शाखा १२ (दहिसर) कडे या प्रकरणाचा समांतर तपास सोपविण्यात आला होता.
गुन्हे शाखाकडे तपास
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले असता दोन व्यक्ती एका लहान मुलाला भींतीवरून घरात चढवत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने मग सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे माग काढायला सुरवात केली. त्यानंतर तीन आरोपींना मालाड येथून अटक करण्यात आली. त्यात या लहान मुलाचा समावेश आहे. दिपक धनवे आणि विनायक बाविस्कर अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चोरी करण्यात आलेले ४८० ग्रॅम वजनाचे दागिने, १ अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर) आणि ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
मुलाने चोरले पिस्तूल
आरोपीनी चोरी करण्यासाठी लहान मुलाला प्रशिक्षण दिले होते. दिवसा बंद असलेल्या घरात रेकी करून ते मुलाच्या मदतीने चोरी करत होते. लहान मुलगा असल्याने कुणाला संशय येत नाही आणि त्याला निमुळत्या जागेतून सहज प्रवेश करता येतो. कर्नलचे घर आहे हे आरोपींना माहित नव्हते. त्यांनी कुलूप तोडून भींतीवर मुलाला चढवले होते. मुलाने खिडकीतून प्रवेश केला. त्याला मौल्यवान वस्तू, दागिने उचलून आणण्यास सांगितले होते. मात्र त्याला पिस्तूल दिसल्यावर ते देखील त्याने उचलून आणले होती, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी पिस्तूल आणि काडतुसे एका बॅगेत भरली आणि ती बॅग कुरारच्या जंगलात पुरून ठेवली होती. त्यानंतर आरोपी गोव्यात पळून गेले होते. चोरलेल्या पैशांवर त्यांनी गोव्यात मौजमजा केली होती, असेही पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखा १२ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, समीर मुजावर, युवराज चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
