नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दाऊदच्या जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोप मलिक यांनी केला. तर विविध प्रकरणात आरोप असलेल्या मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर यांना भाजपने पदे दिली असा आरोपही मलिक यांनी केला. तर बनावट नोटांचे रॅकेट चालवणारा इम्रान आलम शेख हा हाजी अराफत यांचा लहान भाऊ होता, ज्याला लगेच जामीन मिळाला असा आरोप मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर देत प्रतिहल्ला केला आहे. “हायड्रोजन सोडा आता ऑक्सिजनची गरज लागेल अशी मलिक यांची परिस्थिती आहे, विविध नावे समोर आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. हे म्हणजे अकबर बिरबलाच्या गोष्टीतील बिर्याणीसारखं आहे. संपूर्ण राज्याची यंत्रणा लावून सुद्धा फडणवीस यांना लागू शकेल असा आरोप मलिक करू शकले नाहीत ” अशी टीका शेलार यांनी केली.

“मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. यांच्यावर गुन्हे नाहीत ही खात्री केल्यावरच त्यांना विविध बोर्डावर पदे देण्यात आली. मुन्ना यादव यांच्यावर जे राजकीय गुन्हे आहेत त्याचे स्पष्टीकरण ते स्वतःच लवकरच करतील. गेले दोन वर्षे मलिक साहेब तुमचे सरकार आहे, तुमच्या नेत्याकडे गृहमंत्री पद आहे. ज्यांच्यावर आरोप करत आहे त्यांच्यावर साधा अदखलपात्र सुद्धा नोंद करू शकले नाहीत. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा, कोणताही गैरकारभार फडणवीस यांच्या काळात झाला नाही” असं शेलार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

“बीकेसीमध्ये खोट्या नोटांच्या प्रकरणात आलम शेख याचा उल्लेख केलात हा तर आता राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. रियाझ भाटीचा उल्लेख मलिक यांनी केला, आम्ही स्पष्ट करतो की पंतप्रधान कार्यालयाचा याचा काहीही संबंध नाही”, असं सांगत शेलार यांनी रियाझ भाटी याचे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्याबरोबरचे फोटो दाखवले. “कोणाची नावे बदनाम करण्याकरता फोटो दाखवण्याचा धंदा करू नका. एक बोट दाखवले तर चार बोटं तुमच्याकडे असतील. रियाझ भाटी आता कुठे आहे? आमचे म्हणणे आहे की त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं आहे. वाझे वसुली गॅंगमध्ये जी नावे समोर आली आहेत त्यामध्ये रियाझ भाटी याचे नाव आहे”, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला.

मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे की काय ? जावयाच्या प्रेमापोटी नीच पातळीवर जाऊ नका, नवाबी पातळीवर जाऊ नका. राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्ते यांना नेस्तनाबूत करण्याचे काम मलिक यांच्याकडून होत आहे. आर्यन खान तुमच्यामुळे अडचणीत आला. शाहरुख खानला अडचणीत आणण्याचे काम केले. अशी घणाघाती टीका शेलार यांनी मलिक यांच्यावर केली.

गुन्हेगारांशी व्यवहार करण्यासाठी तुमचं कोणी मास्टरमाईंड होतं का ? टाडाच्या आरोपीची मालमत्ता सरकार ऐवजी तुमच्याकडे कशी आली ? याची उत्तरे द्यावी लागतील. पी बी सावंत यांच्या रिपोर्टने ज्यांना भ्रष्ट ठरवलं ते भ्रष्ट्राचारचे आरोप करत आहेत अशी बोचरी टीका शेलार यांनी केली.