मुंबई: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची गुजरात पोलिसांकडून माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी अवघ्या तासाभरात त्याला ताब्यात घेतले आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे आरोपीने हत्या केली होती. पंतनगर पोलिसांनी आरोपीला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.
अशोक जंगम (२८) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा घाटकोपरमधील रमाबाई कॉलनी येथील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी अशोक कामानिमित्त पत्नी रीनासोबत गुजरातमधील अहमदाबाद येथे गेला होता. मात्र चारित्र्याच्या संशयावरून त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. याच करणावरून मंगळवारी सकाळी त्याचा पत्नीसोबत वाद झाला.
संतप्त झालेल्या अशोकने धारदार हत्याराने पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला होता. अहमदाबाद येथील नारोल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अशोक घाटकोपरमधील रमाबाई कॉलनी परिसरात असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ पंतनगर पोलिसांशी संपर्क साधला. पंतनगर पोलिसांनी तासाभरातच अशोकचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली.