सावत्र पित्याची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंटमध्ये पुरुन ठेवल्याची घटना शिवडी येथे शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. दहा दिवसांनतर पोलिसांनी पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढला.
  शिवडी येथील ब्रिक बंदर येथे तुळशीराम चव्हाण (३७) हा दुसरी पत्नी रेणू आणि दोन सावत्र मुलांसह राहतो. त्याची पहिली पत्नी ज्योती ही गोवंडी येथे राहते. तुळशीरामला तडीपार करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी तो घरी आला होता. रात्रीच्या वेळी त्याचे पत्नी आणि दोन सावत्र मुले आकाश (२६) आणि दीपक (२०) यांच्याशी भांडण झाले. त्या वेळी आकाशने दगड डोक्यात घालून तुळशीरामची हत्या केली. रात्री ३ च्या सुमारास ही घटना
घडली. आकाशने अंधेरी येथे राहणारे त्याचे सासरे शकील अहमद मोहम्मद शेख आणि मेव्हणा जावेद यांना बोलावून घेतले.
शेख यांनी आपल्या एस्टीम गाडीत तुळशीराम चव्हाणचा मृतदेह टाकून तो शिवडीच्या मेसेंट रोड येथील डी शेडसमोरील रस्त्यालगत खड्डा करून टाकला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर खडीमिश्रित सिमेंट टाकून पुरला. दरम्यान, तुळशीराम बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पहिली पत्नी ज्योतीने पोलिसांत दिली होती. शुक्रवारी ज्योतीला एका महिलेने दूरध्वनी करून तुळशीरामचा मृतदेह पुरल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
शनिवारी सकाळी पुरलेला मृतदेह पोलिसांनी काढून तो शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी तुळशीरामची दोन्ही सावत्र मुले आकाश, दीपक आणि दुसरी पत्नी रेणू हिला अटक केली असून शकील शेख आणि जावेद फरार झाल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमर मराठे यांनी दिली. भांडणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 दरम्यान, तुळशीरामची चौकशी करायला जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा पोलीस टाळाटाळ करायचे, असा आरोप मयत तुळशीरामची बहीण मंदा साळुंखे हिने केला आहे. आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

शेख यांनी आपल्या एस्टीम गाडीत तुळशीराम चव्हाणचा मृतदेह टाकून तो शिवडीच्या मेसेंट रोड येथील डी शेडसमोरील रस्त्यालगत खड्डा करून टाकला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर खडीमिश्रित सिमेंट टाकून पुरला.