रंगभूमीवरील पाश्चात्त्य प्रभाव कमी करून तिचे भारतीय ‘मूळ’ मोठे करण्यात रतन थिय्याम यांचा मोलाचा वाटा आहे.
मुंबई : मणिपूरसह ईशान्य भारतातील नृत्य, परंपरा, कला यांना रंगमंचीय आविष्कारातून राष्ट्रीय प्रवाहात आणणारे नाटककार, दिग्दर्शक, लेखक व कवी रतन थिय्याम यांचे दीर्घ आजाराने बुधवार, २३ जुलै रोजी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. पाश्चात्त्य प्रभावापेक्षा आपल्या मातीशी जडलेल्या नाटकांसाठी ‘थिएटर ऑफ रूट्स’ ही चळवळ उभी करण्यात थिय्याम हे आजन्म अग्रणी राहिले.
गेल्या काही दिवसांपासून थिय्याम आजारी होते. त्यामुळे त्यांना इम्फाळ येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मणिपूरमध्ये जन्मलेल्या थिय्याम यांच्यावर बालपणातच घरातून कलेचे बाळकडू मिळाले. त्यातून त्यांच्यातला चित्रकार घडला. पुढे त्यांनी लेखनकला जोपासत पाच कादंबऱ्याही लिहिल्या, मात्र नाटक हे त्यांचे नेहमीच पहिले प्रेम होते. दृक्-श्राव्य-काव्य हे थिय्याम यांच्या मणिपुरी रंगभूमीचे वैशिष्ट्य. ते त्यांनी मणिपुरी लोकपरंपरा, तिथली जीवनजाणीव यांच्या माध्यमातून रंगभूमीवर हेतुतः आणले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (एनएसडी) पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मणिपूरमध्ये परंतु प्राचीन भारतीय रंगवारशाची कास धरली आणि ‘कोरस रेपर्टरी थिएटर’ची स्थापना केली. त्यातून त्यांनी मणिपूर आणि ईशान्य भारताच्या मातीतले प्रश्न, सामाजिक-राजकीय परिस्थिती यांवर भाष्य करणारी नाटके सादर केली. या नाटकांच्या लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत आणि नेपथ्यापासून संगीत,नृत्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ठेवण्याकडे त्यांचा कल असे.
मणिपुरी विषयांव्यतिरिक्त संस्कृत, पाश्चात्त्य, अन्यभाषिक नाटकेही थिय्याम यांनी तितक्याच निगुतीने सादर केली. ‘नाइन हिल्स वन व्हॅली’, ‘चक्रव्यूह’, ‘ऋतुसंहारम्’, ‘उत्तर प्रियदर्शी’ आदी नाटके सादर करतानाच त्यांनी भारतीय- विशेषतः मणिपुरी नाटक देशोदेशी नेले. रेपर्टरीतील कलावंतांना कायमस्वरूपी पोटापाण्याची सोयही त्यांनी केली. मार्शल आर्ट, संगीत, प्रकाशयोजना, नृत्य यांचा नजरबंदी करणारा खेळ थिय्याम यांच्या नाटकांतून असे. नाटक हे अनेक कलांचे संमिश्रण आहे हे त्यातून प्रकर्षाने त्यांनी ठसवले.
. थिय्याम हे ‘एनएसडी’तून पदवीधर झालेले मणिपूरमधील पहिले व्यक्ती होते. त्यांनी १९८७ ते १९८८ पर्यंत ‘एनएसडी’चे संचालक म्हणूनही काम पाहिले आणि त्यानंतर २०१३ ते २०१७ या काळात अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. तसेच संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. त्यांना १९८७ मध्ये दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच १९८९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले, मात्र नागालँडमधील नॅशनलिस्ट सोशालिस्ट कॉन्सिलशी असलेला शस्त्रसंधी वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत २००१मध्ये त्यांनी हा पुरस्कार परत केला होता.
‘थिएटर ऑफ रूट्स’
१९७० च्या दशकात भारतीय रंगभूमीवर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव होता, तेव्हा भारतीय नाट्यसृष्टीतील ‘थिएटर ऑफ रूट्स’ ही चळवळ थिय्याम यांनी उभी केली. भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि पारंपरिक कलाप्रकारांना रंगमंचावर पुन्हा सादर करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या नाटकात कथेच्या पलीकडे अत्यंत कल्पकतेने वापरलेले संगीत, विविध दृश्ये आणि संवाद लक्षवेधी ठरले. त्यांच्या नाटकांनी सामाजिक संदेश देताना सांस्कृतिक गाभाही जपला.
गाजलेली नाटके
करणभरम (१९७९), इम्फाळ इम्फाळ (१९८२), चक्रव्यूह (१९८४), लेंगशोनेई (१९८६), उत्तर प्रियदर्शी (१९९६), ऋतुसंहारम, अंध युग, वाहूदोक, आशिबागी एशेई, लायरेम्बिगी एशेई, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘राजा’ (१९१०) या नाटकावर आधारित ‘द किंग ऑफ डार्क चेंबर’
पुरस्कार
पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इंडो-ग्रीक मैत्री पुरस्कार (ग्रीस), एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवाकडून फ्रिंज फर्स्ट्स पुरस्कार, कालिदास सन्मान, जॉन डी. रॉकफेलर पुरस्कार, भरत मुनी सन्मान, भूपेन हजारिका फाउंडेशन पुरस्कार
प्रस्थापितांशी संघर्ष
मैतेई-कुकी समाजातील संघर्ष थांबविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२३ साली एक शांतता समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. त्यामध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासह रतन थिय्याम आणि ५० जणांचा समावेश होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैतेई – कुकी समाजातील संघर्षावर व्यक्त होऊन प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ आली आहे, असे सांगून थिय्याम यांनी शांतता समितीत सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
समीक्षकांचे आक्षेप
थिय्याम यांच्या नाटकांतून आशयापेक्षा इतर कलाकुसरच जास्त असते असा आक्षेपही त्यामुळे कधी कधी घेतला जाई. देशविदेशांतील रंगमहोत्सवांतून त्यांची नाटके सादर झाली. “मी नाटक करतो ते आत्मानंदासाठी. प्रेक्षक हा रंगभूमीचा महत्त्वाचा घटक असला तरीही आधी माझे समाधान होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणत.
आदरांजली
‘थिय्याम हे कलेला समर्पित असे व्यक्तिमत्त्व होते. मणिपुरी संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाने या प्रदेशाला ओळख मिळवून दिलीच; पण जागतिक रंगभूमीलाही समृद्ध केले,’ अशी प्रतिक्रिया मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी व्यक्त केली, तर ‘थिएटर ऑफ रूट्स’ चळवळीचे नेतृत्व हरपले’ अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थिय्याम यांना श्रद्धांजली अर्पण केली.