मंत्रालय की सर्कशीचा फड, धनंजय मुंडेंची टीका

मंत्रालयात जाळ्या लावण्यास सुरुवात

मंत्रालय आहे की सर्कशीचा फड? असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी आज मंत्रालयाच्या आवारात नायलॉनच्या जाळ्या लावण्याचा घाट घातला. यावर मुंडे यांनी ट्विटद्वारे अतिशय खरमरीत टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र सीएमओला टॅगही केले आहे. मंत्रालयात मागच्या पंधरवड्यात तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातील दोघांचे प्राण गेले असून यावर उपाययोजना म्हणून या जाळ्या लावण्यात येत आहेत.

”आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने हा अतिशय चांगला प्रयत्न आहे. मात्र सरकराने आत्महत्यांच्या मूळ कारणाचा विचार कऱण्याची आवश्यकता आहे”, असेही मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारला लक्ष्य करत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. काही दिवसांपूर्हवीच हर्षल रावते याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती, त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याच आधी काही दिवस अहमदनगरच्या २५ वर्षीय अविनाश शेटे याने सरकारने कृषी परीक्षेबाबत निर्णय न घेतल्याने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनीही काही दिवासांपूर्वी मंत्रालय परिसरात विष घेऊन आत्महत्या केली होती. अशाप्रकारे मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन आज या जाळ्या बसविण्याचे काम सुरु झाले. त्यावर मुंडे यांनी सडकून टीका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mantralay net to prevent suicide cases dhananjay munde tweet