कधी लोकलचा खोळंबा, कधी वाहतूक कोंडीत फसलेली बस, कार्यालयांत कधी पोहोचायचे, वरिष्ठ काय म्हणतील का, अशा एक ना अनेक विवंचनेने सातत्याने तणाव घेऊन प्रवास करणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरकारने नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे १ जानेवारी २०१५ पासून थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उशीर झाला, घाबरू नका, तेवढाच अधिकचा वेळ काम करा आणि घरी जा, अशी सवलत देण्यात आली आहे.
 मंत्रालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी पनवेल, कर्जत, खोपोली, विरार इत्यादी दूरच्या ठिकाणाहून येतात. प्रवासाची सारी भिस्त अर्थातच उपनगरी रेल्वे सेवेवर असते.  प्रवासातील या अडचणींमुळे सर्वसाधारणपणे बहुतेक कर्मचारी सरासरी दहा मिनिटे उशिरा कार्यालयात पोहोचतात. त्यामुळे तेवढा वेळ उशिरा येण्याची सवलत त्यांना देण्यात आली होती. सलग दोन वेळा ही सवलत मिळते, तिसऱ्यांदाही उशीर झाला तर मात्र त्याची एक नैमित्तिक रजा कापली जाते. अधिकारी व कर्मचारी दूरवरून प्रवास करून येतात, त्यामुळे कार्यालयीन वेळेत थोडी लवचीकता असावी, अशी विविध संघटनांची मागणी होती.
राज्य शासनाने त्याची दखल घेऊन मंत्रालयीन कामकाजाच्या वेळेत लवचीकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी स्वागत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्रालयातील कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० अशी आहे. आता त्यांना जास्तीत जास्त दोन तास उशिरा कामावर येण्याची सवलत मिळणार आहे. अर्थात जितकी मिनिटे कर्मचारी उशिरा येतील, तेवढी मिनिटे कार्यालयात थांबून काम करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mantralaya employee may come late but
First published on: 01-01-2015 at 02:22 IST