मुंबई, ठाणे, पुण्यानजीकच्या फार्महाऊस, रिसॉर्टची पूर्वनोंदणी

मुंबई/कल्याण : करोनाच्या भीतीमुळे गेले दीड वर्ष घरातच अडकून पडलेल्या नागरिकांची यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी होत असतानाच, दिवाळीनंतरच्या सुट्टय़ांचे बेतही आधीच ठरले आहेत. दिवाळी सरताच पर्यटनाला जाण्याकडे असलेला कल या वर्षी अधिक दिसून येत आहे. त्यातही फार दूरवर पर्यटनाला जाण्याऐवजी मुंबई, ठाणे, पुणे या पट्टय़ातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रिसॉर्ट, कृषी पर्यटन केंद्रे, फार्म हाऊस येथे जाऊन सुट्टी उपभोगण्याकडे जास्त ओढा आहे. त्यामुळे यातील बहुतांश ठिकाणी दिवाळीआधीच ग्राहकांची पूर्वनोंदणी झाली आहे.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

करोना निर्बंधांमुळे गेले दीड वर्ष पर्यटन, भटकंतीवरही मर्यादा आल्या होत्या. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले असून लसीकरणाचा टक्का वाढू लागल्यामुळे नागरिकांमधील धास्तीही कमी झाली आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्टय़ा आल्याने अनेक नागरिकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत.लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे ५ ते ७ नोव्हेंबपर्यंत लोणावळा, कर्जत, माथेरान, अलिबाग, नाशिक येथील बहुतांशी हॉटेल, रिसॉर्ट आणि कृषि पर्यटन केंद्रांना १०० टक्के मागणी आहे.  

 ‘पर्यटकांच्या मनात आता भीती उरलेली नाही

आम्हीही त्यांना सर्व सेवा,सुविधा देत आहोत शिवाय तेही स्वत:ची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेतात. यंदा दिवाळीत जोडून सुट्टय़ा आल्याने पर्यटकांनी घराबाहेर दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे. आमच्याकडे मागणी पूर्ण झाली असून आसपासच्या भागातील हॉटेल व्यवसायिकांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. कित्येकांनी पूर्वनोंदणीही थांबवली आहे,’ असे लोणावळा येथील अंजनवेल कृषी पर्यटन क्षेत्राचे राहुल जगताप यांनी सांगितले.

अलिबागमध्येही हॉटेलांना उत्तम प्रतिसाद आहे. भाडय़ाने मिळणारे बंगले, समुद्रकिनाऱ्यालगतची पर्यटकांसाठी उपलब्ध असलेली घरे, हॉटेल पूर्ण क्षमतेने भरली असून गुरुवारी रात्रीपासूनच पर्यटक येथे हजर होणार आहेत. ‘दिवाळीच्या निमित्ताने पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. दिवाळीचे तीनही दिवस पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू राहणार असून अलिबागमध्ये पर्यटक ४ नोव्हेंबरलाच हजर होतील,’असे अलिबाग येथील आवास बीच कॉटेजचे निमिष परब म्हणाले. 

मुरबाड, शहापूरपाठोपाठ भिवंडीकडेही ओढा

मुंबई, ठाण्यापासून अगदी जवळ असलेले निसर्गरम्य मुरबाड, शहापूर तालुक्यांतील पर्यटनस्थळे आणि रिसॉर्ट यांना मागणी असतेच. पण आता भिवंडी पट्टय़ातील फार्महाऊसही पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनू लागले आहेत.  शहरापासून एक ते दोन तासांच्या अंतरावरील मुरबाड, शहापूर, भिवंडीमधील गावांच्या हद्दीतील तलाव, वनराई, डोंगरातील नैसर्गिक वोहळय़ा अशा ठिकाणी जाऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत. घरून तयार करून आणलेले नाष्टा, भोजन किंवा गावातील आचारी पाहून त्याच्याकडून मटण-रश्याचे तिखट चुलीवरचे भोजन तयार करून घ्यायचे. पळस, करवेळा झाडांच्या हिरव्यागार पानांच्या पत्रावळी तयार करायचा. भोजनावर ताव मारायचा, अशी पद्धत पर्यटकांनी अनुसरली आहे. गाव हद्दीत येणाऱ्या या शहरी रहिवाशांसाठी पर्यावरणपूरक निवासासाठी राहुटय़ा, तलाव, लॉन्स, धबधबा शेतघर परिसरात उपलब्ध करून दिले जात आहेत.

ग्रामस्थांकडहून बोटपर्यटन सुविधा

भिवंडीजवळील चिंचवली गावातील तलाव, डोंगर-दऱ्यांत शहरी रहिवासी शनिवार, रविवारी अधिक संख्येने पर्यटनासाठी येतात. या रहिवाशांना तलावात बोटीतून फेरफटका मारण्याचा आनंद लुटता यावा म्हणून ग्रामस्थांनी एक बोट खरेदी केली आहे. तलावाकाठी विविध प्रकारच्या पक्ष्यांचा संचार, वनसंपदा बहरली आहे. चिंचवलीतील पर्यटकांची वाढती संख्या पाहून तलावाकाठी झाडे, झुडपे यांचा आधार घेऊन पर्यावरणपूरक राहुटय़ा बांधण्याची तयारीही गावात सुरू झाली आहे. यामुळे गावातील पर्यटन वाढून, ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल, गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे चिंचवलीचे ग्रामस्थ हेमंत पाडेकर यांनी सांगितले.