तारीख निश्चित होण्याआधी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील ‘मराठा क्रांती मोर्चा’ची तारीख निश्चित झाली नसली तरी, आतापर्यंतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढून तो यशस्वी करण्यासाठीच्या ‘मोर्चे’बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुंबईभरातून स्वयंसेवक जमा करण्यात येणार आहेत. मोर्चेकरींना पाणी पुरविण्यापासून रस्त्यावर होणारा कचरा उचलण्यापर्यंतच्या लहानसहान कामासाठी मराठा तरूणांना एकत्र करण्याकरिता विभागीय पातळीवर ‘व्हॉटस्अ‍ॅप’सारख्या माध्यमातून कार्यकर्ते एकत्र येत आहेत. विभाग स्तरावर होणाऱ्या या बैठकांमध्ये तरूणांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यांच्या मागण्यांच्या आधारे सर्वसमावेशक अशा मागण्यांचे निवेदन मोर्चापूर्वी तयार करण्यात येणार आहे.

कोपर्डी घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या नेतृत्त्वाखाली मराठा जातबंधू मूक मोर्चाचे आयोजन करून आपली ताकद दाखवून देत आहेत. अत्यंत शिस्त आणि पद्धतशीरपणे निघणाऱ्या या मोर्चाच्या आयोजनामागे मराठा समाजातील अनेक संस्था-संघटना कार्यरत आहेत. आता मुंबई आणि ठाण्यात मोर्चा काढून त्यात विक्रमी संख्येने मोर्चेकरींनी सहभागी व्हावे यासाठी मुंबईतील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबईतील मोर्चानंतर राज्य सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतलाच पाहिजे असा सूर मुंबईत काही ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये उमटला.

घाटकोपरमधील पंतनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीकरिता तर केवळ व्हॉटसअपच्या माध्यमातून कार्यकर्ते जमले होते. सुमारे १०० जणांच्या या बैठकीत तरूणांचा सहभागही लक्षणीय होता. आरक्षण नसल्यामुळे आलेली बेरोजगारी, शाळेत किंवा महाविद्यालयात गुणवत्ता असूनही प्रवेश न मिळणे, आपल्या मागे समाज उभा का राहत नाही? अशा अनेक समस्या या बैठकीत मांडण्यात आल्या. आरक्षणाच्या मागणीवर प्रतिनिधींचा मोठा भर होता. आपल्यासाठी नसले तरी भविष्यातील आपल्या पिढीला आरक्षणाचा फायदा होईल, अशा भावना समाजातील आबालवृद्ध व्यक्त करीत होते. अर्थात या बैठकांमध्ये तरूणांना बोलण्यास, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

बैठकीत सहभागी होणाऱ्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चा स्वयंसेवक बनण्यासाठीचा एक अर्ज दिला जात आहे. ज्या तरुणांना स्वयंसेवक होण्याची इच्छा आहे, त्याची नाव, पत्ता, दूरध्वनी, शिक्षण आदी माहिती जमा केली जात आहे. या शिवाय मराठा तरूणांशी दूरध्वनी किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चर्चा आणि संवाद साधला जात आहे. स्वयंसेवकांवर मोर्चासाठी लागणारे झेंडे, बॅनर, पाणी, जेवण, रांगेचे नियोजन इत्यादींचे नियोजन करण्याची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर राज्यभरातून येणाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय, मोर्चासाठीच्या परवानग्या आदी विविध जबाबदाऱ्या स्वयंसेवकांवर सोपविण्यात आल्या आहेत. अनेक उत्साही तरुण या कामात स्वत:हून पुढाकार घेत आहेत.

येत्या ३० तारखेला दादर येथील शिवाजी मंदिरात होणाऱ्या बैठकीत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्य़ातील पाच प्रतिनिधी येणार आहेत. आपल्या जिल्ह्य़ातून मोर्चेकरी जमविण्याची जबाबदारी या पाच प्रतिनिधींवर असते. शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या बैठकीत मुंबईच्या मोर्चाचे ठिकाण आणि तारीख ठरण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha morcha preparation in mumbai
First published on: 29-09-2016 at 02:47 IST