विकसित देशांमधील शहरांच्या पावलावर पाऊल टाकत तेथपर्यंत जाण्यासाठी विकसनशील देशांमधील शहरे धडपडत असतात. मात्र गेल्या आठवडय़ात लंडनमध्ये २४ मजली इमारतीला लागलेल्या आगीनंतर ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ होण्याची वेळ आली आहे. काळबादेवीचे गोकुळ निवास, अंधेरीचे लोटस टॉवर किंवा वाऱ्यावर पसरणाऱ्या आगीमुळे भस्मसात झालेली दामूनगर झोपडपट्टी अशा दुर्घटना केवळ आपल्याकडेच घडतात, या समजुतीला या घटनेने तडे गेले. कापराप्रमाणे भुरुभुरु पेटत गेलेली वेस्ट लंडन अपार्टमेंट इमारत व आगीच्या ज्वाळांमागून येणारे मदतीसाठीचे आक्रोश हे दृश्य लंडनच्या जनतेच्या डोळ्यांसमोर पुढील अनेक वर्षे दु:स्वप्नाप्रमाणे तरळणार आहे.

या आगीमध्ये नेमके किती जण गेले त्याचे निश्चित आकडे अजूनही समोर आलेले नाहीत. या इमारतीत साधारण ६०० लोक राहत होते. आग लागली तेव्हा इमारतीत ५८ लोक अडकले होते. त्यातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग चौथ्या मजल्यावर लागली. सुरुवातीला आग आटोक्यात येईल असे वाटले होते. मात्र इमारतीला अत्यंत ज्वलनशील अशा अ‍ॅल्युमिनिअमचे आवरण होते. कापूर जळत जावा तसा या आवरणाने पेट घेतला आणि अवघ्या काही तासांत होत्याचे नव्हते झाले. २४ व्या मजल्यापर्यंत पेटत गेलेली ही आग काबूत आणण्यासाठी लंडनच्या अग्निशमन दलाला अख्खा दिवस लागला. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे नवी रचना, नवीन तंत्रज्ञान प्रत्येक वेळी अधिक उत्तम व चांगले असेल या समजुतीलाही या घटनेने धक्का दिला आहे. या घटनेपेक्षाही भीतीदायक बाब म्हणजे लंडनमधील हजारो उंच इमारतींमध्ये ज्वलनशील अ‍ॅल्युमिनिअमचे आवरण आहे. म्हणजेच तेथील लाखो लोक लाखेच्या महालात राहत आहेत.

भारतात हे अ‍ॅल्युमिनिअमचे लोण फारसे पसरलेले नाही. मात्र त्यामुळे आपण शांत-निवांत बसण्यासारखीही स्थिती नाही. लंडन, न्यूयॉर्कप्रमाणे काचेच्या इमारती कितीही छान दिसत असल्या तरी काचेच्या तावदानांनी झाकलेल्या इमारतींमध्ये आग वरून खालीही पसरते आणि वातानुकूलनाची व्यवस्था नसल्याने लोक गुदमरतात हे गेल्या काही वर्षांतील अनुभवावरून लक्षात आले आहे. अर्थात काचेची तावदाने हा आपल्याकडे काळजी करण्यासारखा एकमेव विषय नाही. गेल्या काही वर्षांतील उंच इमारतींमधील आगीच्या घटना आणि त्या विझवताना समोर आलेल्या गोष्टी पाहता आपल्याकडेही ‘आग पसरवणाऱ्या व आटोक्यात येऊ न देणाऱ्या’ बाबींची लांबलचक यादी करता येईल. त्यात इमारतीच्या बांधकाम यंत्रणेसोबतच त्यात कार्यान्वित नसलेली अग्निशमन यंत्रणा, विद्युतयंत्रणा बसवताना केलेला निष्काळजीपणा, इमारतीच्या बाजूला अग्निशमन दलाचे बंब, शिडय़ा जाऊ  शकतील, अशा मोकळ्या जागेचा अभाव, मोकळ्या जागेत रहिवाशांनी लावलेली वाहने, आग विझवण्याच्या प्राथमिक उपायांमधील कसूर, अग्निशमन केंद्राचे घटनास्थळापासूनचे अंतर, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, बघ्यांची गर्दी.. अशा अनेक, अनेक बाबी अंतर्भूत करता येतील. यातील काही बाबी या अग्निशमन दलाशी संबंधित आहेत तर काही संबंधित इमारत, पालिका-पोलीस यांसारख्या यंत्रणा व काही थेट एकूणच पायाभूत सुविधांची निगडित आहेत.

अग्निशमन दलात गेल्या दोन वर्षांत बदल होत आहेत. मात्र त्यासाठीही मोठी दुर्घटना कारणीभूत ठरली. दोन वर्षांपूर्वी, ९ मे २०१५ रोजी काळबादेवीत गोकुळ निवास या लाकडी इमारतीने पेट घेतल्यावर तर संपूर्ण अग्निशमन दलच आगीच्या परिक्षेत्रात आले. अग्निशमन दलप्रमुख सुनील नेसरीकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा बळी घेणाऱ्या या आगीनंतर महानगरपालिकेने चौकशी समिती नेमली. तेव्हा अग्निशमन दलाची जुनाट कार्यपद्धती, बेशिस्त व समन्वयाचा अभाव या कारणांमुळे गोकुळ हाऊसच्या आगीचा भडक्यात अग्निशमन दल होरपळून निघाले, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. आग विझवण्यासाठी सुनिश्चित कार्यप्रणाली असावी, पक्षी सोडवणे, झाड उचलणे अशा अतिरिक्त कामांचा भार अग्निशमन दलावरून काढून टाकावा, नवीन लघू अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरू करावीत, दुर्घटनेच्या ठिकाणी समन्वय ठेवण्यासाठी घटना अधिकारी नेमावा, अशा अनेक शिफारशी चौकशी समितीने केल्या. काळबादेवी दुर्घटनेचा आघात एवढा जबरदस्त होता की अग्निशमन दलात तातडीने बदल करण्यासाठी पालिकेने पावले उचलली.

अग्निशमन दलात तब्बल दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आखून दिलेली कार्यप्रणाली अस्तित्त्वात होती. काळबादेवीनंतर अग्निशमन यंत्रणेतील मुख्य अधिकाऱ्यांनी लंडन, न्यूयॉर्क तसेच इतर शहरांमधील आगीच्या घटना व त्यांच्याकडील अद्ययावत कार्यप्रणाली यानुसार आपल्याकडील प्रमाणित पद्धत निश्चित केली. इमारतींची वाढलेली उंची तसेच अग्निशमन दलाचे जवान यांच्या सुरक्षितता या गोष्टी ध्यानात घेतल्या गेल्या. जवानांची भरती हा आणखी एक कळीचा मुद्दा होता. मात्र गेल्या वर्षभरात त्याबाबतीतही अग्निशमन दलाने मोठा पल्ला गाठला आहे. यंत्रांच्या बाबतीतही अग्निशमन दल सज्ज आहे. उंच शिडय़ा, आग विझवण्यासाठी अद्ययावत यंत्रे खरेदी केली गेली. शहराच्या विविध भागांत लघू अग्निशमन केंद्र उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षी सोडवणे व झाड उचलणे यातून मात्र या दलाची अजूनही सुटका झालेली नाही. महालक्ष्मी स्थानकाजवळ झाडावरील कावळा वाचवताना दोघा जवानांचा मृत्यू ही घटना तर ताजीच आहे.

अग्निशमन दल सुसज्ज होत असले तरी इतर यंत्रणांबाबत मात्र असे म्हणण्याची स्थिती नाही. उंच इमारतींमधील आगीच्या घटना व अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने इमारतींना पाठवण्यात आलेल्या नोटीस यामुळे उच्चभ्रू इमारतीतील रहिवासी व व्यावसायिक याबाबत सजग झाले आहेत. मात्र इंच इंच जागेसाठी लाखो रुपये खर्च होत असलेल्या मुंबईत आग विझवण्यासाठी काही जागा मोकळी ठेवावी, असे कोणालाही मनापासून वाटत नाही. त्यामुळे केवळ अग्निशमनासाठी वेगळे उद्वाहन, पायऱ्या मोकळ्या ठेवणे, गच्चीवर सामान न ठेवणे या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्षच होते. झोपडपट्टीतील आग असो किंवा उंच आलिशान टॉवरमधील आग, यातील ९० टक्क्यांहून अधिक दुर्घटना लागतात. मात्र तरीही विद्युतयंत्रणेबाबत निष्काळजीपणा कायम आहे. काळबादेवी दुर्घटनेनंतर वीजयंत्रणेचे ‘ऑडिट’ बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्याबाबत अद्यापही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. जुन्या लाकडी इमारती, अरुंद गल्ल्या, वाहतूक कोंडी यावर मार्ग काढणे हे अग्निशमन दलाच्या कार्यकक्षेत येत नाही. त्यासाठी संबंधित यंत्रणांनीच हातपाय हलवायला हवेत. आग पाहण्यासाठी लोटणारी बघ्यांची गर्दी ही तर केवळ आपली अशी वैशिष्टय़पूर्ण समस्या आहे. २६ नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला आणि चित्रपटाचे चित्रीकरण, यातील फरकच आपल्याला समजत नाही. अनेक आगीच्या घटनांमध्ये बघ्यांची गर्दी बाजूला करणे हाच अग्निशमन दलासाठी मोठा कार्यक्रम होतो. ही समस्यांची जंत्री वाढतच जाणारी आहे.

कोणी कल्पनाही करू शकत नाही, अशा पद्धतीने घडलेल्या लंडनमधील आगीच्या घटनेने आपल्याला जागे केले आणि पुढच्याच ठेच पाहून आपण शहाणे व्हायचे ठरवले तरच इथे दिलेल्या जंत्रीचा उपयोग. अर्थात झोपेचे सोंग घेतलेल्याला कोणी जागे करू शकत नाही, हेदेखील तेवढेच खरे!

प्राजक्ता कासले

prajakt.kasale@expressindia.com