ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या ‘ओयूपी नॉव्हेल्स’ या योजनेअंतर्गत सहा भारतीय लेखकांच्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद इंग्रजीत प्रकाशित करण्यात आले असून यात मराठीतील लेखिका सानिया यांच्या ‘त्यानंतर’ या कथासंग्रहाचा समावेश आहे. ‘ऑक्सफर्ड’ने भारतीय भाषांमधील काही निवडक साहित्य इंग्रजीत अनुवादित करण्याचे ठरविले असून या योजनेमुळे या भाषांमधील साहित्य आता जागतिक पातळीवर पोहचणार आहे. हा कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
या योजनेच्या सुरुवातीला विष्णुपंत गोडसे लिखित ‘माझा प्रवास’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक मराठीतील पहिले प्रवासवर्णन मानले जाते. प्रिया आडारकर आणि शांता गोखले यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे. भाषांतरकार आणि अनुवादक यांचा सहभाग असलेला ‘तर्जुमा महोत्सव’ काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात ‘ऑक्सफर्ड नॉव्हेल्स’ची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भारतीय प्रादेशिक भाषांमधील मराठीसह तामिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम या भाषेतील सहा लेखकांच्या कादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे. सानिया यांच्या ‘त्यानंतर’ या कादंबरीचा अनुवाद माया पंडित यांनी केला आहे.
भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने ते इंग्रजी भाषेत अनुवादित केले जाणार आहे. यामुळे भारतीय लेखकांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठा आणि ओळख मिळणार आहे. ‘ऑक्सफर्ड इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रंजन कौल, ‘ओयुपी नॉव्हेल्स’ प्रकल्पाच्या संपादक मिनी कृष्णन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पुढेही भारतीय भाषांमधील निवडक साहित्य ऑक्सफर्ड युनिव्हव्‍‌र्हसिटी प्रेसतर्फे इंग्रजीत अनुवादित केले जाणार आहे.