मुंबई : विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. मुंबईतील विविध भागांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल – ताशांच्या गजरात आगमन व विसर्जन मिरवणुका निघतात. या धामधुमीत हातात काठी आणि डोक्यावर कच्छी ढोल घेऊन हजारोंच्या गर्दीला नाचवणाऱ्या मिलिंद जंगम या सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर आधारित ‘वाजव रे’ हा मराठी चित्रपट ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
मुंबईतील वडाळा येथे एका सर्वसामान्य गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या मिलिंद जंगम यांना लहानपणापासूनच वादनकलेची आवड होती. शाळेतून घरी येऊन अभ्यास झाल्यानंतर मिलिंद हे घरातील विविध डब्बे वाजवत राहायचे. या गोष्टीला वडिलांचा विरोध होता, तर आईने शिक्षण सांभाळून वादनकला जोपासण्याचा सल्ला दिला होता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मिलिंद यांना बराच संघर्ष करावा लागला. मायकेल जॅक्सन व मिथुन चक्रवर्ती यांचे चाहते असलेल्या मिलिंद यांनी सुरूवातीला एका मित्रासोबत विविध कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरण केले.
यादरम्यान त्यांना विविध पारितोषिकेही मिळाली. पुढे मित्राने बँजो पार्टी सुरू केल्यानंतर त्यामध्ये खुळखुळे वाजवायला सुरूवात केली. यादरम्यान मित्र महेंद्र कदम यांनी ड्रम व ढोल वाजवायला शिकवला. तसेच सुरुवातीला चार वर्ष एकल कच्छी ढोल वाजविल्यानंतर मिलिंद यांनी दुहेरी कच्छी ढोल वाजवायला सुरुवात केली. तर जेव्हा निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ म्हणजेच ‘गिरगावचा राजा’साठी कच्छी ढोल वाजवायला सुरुवात केली, तेव्हा मिलिंद जंगम यांना ‘गिरगावचा लाडका मिलिंद’ ही ओळख मिळाली. एकंदरीत या प्रवासातील महत्वपूर्ण घडामोडी ‘वाजव रे’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
राठोड फिल्मस प्रायव्हेट लिमिटेड निर्मित जय कमलेश राठोड दिग्दर्शित ‘वाजव रे’ चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर याने मिलिंद जंगम यांची भूमिका साकारली आहे. तर गौरव मोरे, गणेश यादव, तन्वी शिंदे आदी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. संवादलेखन विनायक गायकवाड यांनी केले आहे, तर मनोज प्रेमदत्त शर्मा निर्माते आहेत.
‘माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीवर ‘वाजव रे’ नावाचा चित्रपट येत आहे, हा माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण क्षण असून यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या संपूर्ण प्रवासात मित्रमंडळी, प्रेक्षक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खंबीरपणे पाठिंबा दिला आहे’, असे मिलिंद जंगम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दिग्दर्शक जय राठोड म्हणाले की, ‘आयुष्याच्या प्रवासात आपण विविध गोष्टी करीत असतो आणि आपल्याला आपण करीत असलेल्या कामाचा अभिमानच असायला हवा. कधीतरी तुमच्याकडे लक्ष जाणारच आहे आणि तुमच्या कामाचे निश्चितच कौतुक होईल. याप्रमाणेच कच्छी ढोल वादक मिलिंद जंगम यांचा प्रवास व वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष ‘वाजव रे’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे’.