scorecardresearch

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव; ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार

Vinda Karandikar Jeevan Gaurav to Chandrakumar Nalge

मुंबई : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा  कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांना  जाहीर झाला आहे. तर ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन २०२२च्या पुरस्कारांची घोषणा केली.यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.  विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रकाशनने आतापर्य १ हजार २४० ग्रंथ प्रकाशित केले आहेत. गेली ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.

डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोली चे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी  द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख २ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेडय़ातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्ष ते कार्यरत आहेत. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  तर  कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 00:57 IST
ताज्या बातम्या