कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचे निधन

आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं..
आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं..

हे जग कवितांचे, गाण्यांचे, ललित लेखांचे आणि मीरा-कबीराच्या भाषांतराचे.. मराठी काव्यरसिकांचे.. कविवर्य मंगेश पाडगावकर या मिश्कील, खटय़ाळ आजोबाच्या निधनाने ते खरोखरच मुके झाले. ज्यांच्या प्रतिभेच्या धारानृत्याने मराठी साहित्यरसिकांना गेली सहा दशके रिझविले, सुखविले, जगायला शिकविले ते जीवन-जिप्सी अनंताच्या प्रवासाला निघून गेले. वृत्तबद्ध काव्यापासून नादवंत बोलगाण्यांपर्यंतच्या कवितेच्या विविध रंगरूपांतून जीवनाचे आनंदमयी तत्त्वज्ञान मांडणाऱ्या या कविश्रेष्ठाने मराठी मातीला कवितेचा उत्सव साजरा करायला शिकविले. साजरेपणातही काव्य असते हे त्यांनी दाखवून दिले. बुधवारी जणू त्या काव्योत्सवावरच पडदा पडला. वयाच्या ८६ व्या वर्षांपर्यंत आपल्याच काव्यधुंदीत जगलेल्या या अवलियाचे बुधवारी वृद्धापकाळाने शीव येथील निवासस्थानी निधन झाले. बुधवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना अखेरचा सलाम करताना पापण्यांत दाटलेल्या दुखाश्रूंनी असंख्य रसिकांच्या नजरेसमोर उभे राहिले ते रितेपणाचे धुके धुके..
गेल्या सहा महिन्यांपासून पाडगावकर आजारी होते. तब्येतीच्या असंख्य तक्रारींमुळे त्यांच्या डॉक्टर मुलांनी घरातच त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग उभारला होता. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पाडगावकरांची प्राणज्योत मालवली. शीव येथील दत्त निवासातल्या घरी त्यांची लिखाणाची एक स्वतंत्र खोली होती. या खोलीतच आपल्याला मरण यावे अशी त्यांची इच्छा होती. बाबांनी लिखाणाच्या खोलीतच अखेरचा श्वास घेतला, असे सांगताना त्यांचे धाकटे पुत्र डॉ. अजित पाडगावकर यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कवी, साहित्यिक, कलाकार, प्रकाशक, राजकारणी आदींनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि आनंदयात्री कवीचे अखेरचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडगावकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. बुधवारी दुपारी पाडगावकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आणि शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर मराठीत उदयाला आलेल्या नवकवींच्या मांदियाळीत मंगेश पाडगावकर हे एक अग्रेसर नाव. कोवळ्या वयातल्या त्यांच्या कवितांवर कविवर्य बा. भ. बोरकर यांचा स्पष्ट प्रभाव दिसतो, असं जाणकारांचे म्हणणे आहे.
प्रेमाचे निरनिराळे विभ्रम आपल्या शब्दश्रीमंत शैलीत काव्यबद्ध करणारे, प्रेमळ भाववृत्तीचे पाडगावकर अखेरच्या काळात कबीर, मीरा यांचे काव्य आणि बायबलकडे वळले तेव्हा आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांकडे बोलून दाखवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.