मुंबई : मराठवाडय़ासह राज्यातील पाणी समस्या असलेल्या भागातील नदी जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य वापर करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी गुजरातमधील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत केली. त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून हा मराठी अस्मितेचा मुद्दा असल्याने लवकर निर्णय घ्यावा, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>> मुंबई-जीवी : तेजस्वी सूर्यपक्षी

बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दिव या केंद्रशासित राज्याचे प्रशासक, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासमवेत महाराष्ट्र समन्वयाने काम करीत असून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकही झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. राज्य शासन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी डहाणू ते सिंधुदुर्गपर्यंत सागरी किनारपट्टी मार्ग (कोस्टल रोड) तयार करीत आहे. तो गोवा आणि गुजरातशी जोडला गेला, तर या राज्यातही पर्यटन मोठय़ा प्रमाणावर वाढेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात राज्य शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती देऊन ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत १.५ कोटीपेक्षा जास्त लाभार्थीना लाभ देण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले.  महाराष्ट्र हे विदेशी गुंतवणुकीत देशातील आघाडीचे राज्य झाले आहे. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेतील (वल्र्ड इकॉनॉमिक फोरम) सुमारे ७५ टक्के सामंजस्य करारांची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे.