निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे परिपत्रक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून देण्यात आल्यानंतर दोन दिवस सामुहिक रजेवर गेलेले साडेचार हजार निवासी डॉक्टर शुक्रवारी रात्री आठ वाजता कामावर रुजू झाले. त्यामुळे पालिका व सरकारी रुग्णालयात कोलमडलेली सेवा पुन्हा रुळावर येऊ शकेल.
क्षयरोग व प्रसुतीसाठी दोन महिन्यांची भरपगारी रजा, कामाचे तास कमी करणे, बॉण्डबाबत तातडीने निर्णय घेणे, विद्यावेतनात पाच हजार रुपयांची वाढ, ओबीसी -एससी- एनटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे आदी मागण्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर कडून करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत या सर्व मागण्या तत्त्वत मान्य करण्यात आल्या. मात्र त्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्याशिवाय सामुहिक रजा आंदोलन मागे घेणार नसल्याचे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले. सरकारी रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाल्याने शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा बैठक घेऊन तातडीने लेखी स्वरुपात पत्रक देण्यात आले. त्यानुसार एक ऑगस्टपासून डॉक्टरांना पाच हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही दोन महिन्यांच्या भरपगारी रजेसाठी भारतीय आयुर्विमा परिषदेकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. कामाचे तास बारावरून आठवर आणण्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करावी लागणार आहेत. त्यासंबंधीही वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे प्रस्ताव सादर करून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी वित्त विभागाच्या विचारार्थ पाठवल्या जातील. बॉण्डसाठी प्राविण्यानुसार जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यासोबतच डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भातील कायदेशीर कारवाईचे स्पष्ट फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिष्यवृत्तीबाबतही तातडीने पावले उचलली जाण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळाल्याने मार्डचे डॉक्टर शुक्रवारी रात्री आठपासून कामावर परतले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2015 रोजी प्रकाशित
मार्डचा संप मागे; दोन दिवस रुग्णांचे हाल
निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे परिपत्रक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून देण्यात आल्यानंतर दोन दिवस सामुहिक रजेवर गेलेले साडेचार हजार निवासी डॉक्टर शुक्रवारी रात्री आठ वाजता कामावर रुजू झाले.

First published on: 04-07-2015 at 03:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mard doctor ends strike