मुंबई : चर्नीरोड येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीशी आरोपी सुरक्षारक्षकाने यापूर्वीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती तिच्या मैत्रिणीच्या जबाबातून उघड झाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आठ जणांचे जबाब नोंदवले. आरोपी ओमप्रकाश कनोजियाने यापूर्वीही या विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तिने तिच्या मैत्रिणीला सांगितली होती. त्या वेळी तिने हा प्रकार वॉर्डनच्या कानावर घालण्यासही सांगितले होते. पण तिने तक्रार करणे टाळल्याचे समजते. याबाबत वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी विचारले असता त्यांच्याकडे अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात मृत विद्यार्थिनीच्या आई-वडील, मैत्रीण आदींचा समावेश आहे. विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या मैत्रिणीने सर्वप्रथम पाहिला. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी रात्री अकरा वाजेपर्यंत तिच्यासोबत होती. त्यानंतर ती तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. सकाळी अनेक वेळा दूरध्वनी केले. या काळात तिच्या कुटुंबीयांनीही तिला दूरध्वनी केले होते. मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिच्या मैत्रिणीने अखेर सायंकाळी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवही तपासली. त्यानुसार ही विद्यार्थिनी वसतिगृहात आल्याची नोंद होती. पण बाहेर गेल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे तिने खोलीजवळ जाऊन पाहिले असता तिला मृतदेह दिसला. याबाबत तिने वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडून प्रवेश केला असता विद्यार्थिनी जमिनीवर पडली होती. गळा आवळून तिची हत्या केली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गळा दाबूनच तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईत नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत मुलांना, मुलींना, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र तसे घडताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे. खरे तर वसतिगृहात त्या नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कसे नेमण्यात आले होते. यामध्ये वस्तुस्थिती नेमकी काय आहे? किती जणांनी हे कृत्य केले? याची चौकशी झाली पाहिजे. - अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मुंबईत वसतिगृहात झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेबाबत केंद्र व महाराष्ट्र सरकार गंभीर नाही. महिला, मुलींच्या वसतिगृहात कॅमेरे, सुरक्षाव्यवस्था याला प्राधान्य द्यायला पाहिजे. सध्या सातत्याने महिला आणि मुली यांच्याविरोधात ज्या घटना घडत आहेत त्यातून केंद्र व राज्य सरकारची मानसिकता आणि हेतू स्पष्ट होतो. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावित्रीबाई फुले वसतिगृहाची अवस्था ही अत्यंत वाईट असून, असुरक्षितता आहे. मुली राहत असलेल्या खोल्याही वाईट अवस्थेत आहेत. प्रत्येक मजल्यावर सरकारी महिला सुरक्षारक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत वसतिगृह अधीक्षकांनीही वारंवार मागणी केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला. - विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस