या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

|| शैलजा तिवले

समाजातील गैरसमजुतींमध्ये आणखी भर :- पहिल्या शरीरसंबंधांनंतर स्त्रीच्या जननमार्गातून रक्तस्राव होतो, ही संकल्पना अवैज्ञानिक असल्याचे सिद्ध झाले असतानाही लग्नानंतर कौमार्यत्व पटवून देणाऱ्या ‘व्हर्जिनिटी कॅप्सूल’चा सुळसुळाट झाला आहे. या गोळ्यांची सर्रास ऑनलाइन विक्री होत असून स्त्रीच्या कौमार्याविषयी समाजात आधीच असलेल्या गैरसमजुतींना या फसव्या गोळ्यांच्या मार्गाने आणखी खतपाणी घातले जात आहे.

पहिल्या शरीरसंबंधांनंतर स्त्री-जननमार्गातून रक्तस्राव होतो, ही धारणा गेल्या कित्येक पिढय़ांपासून कायम आहे. त्याबाबत पुरते संशोधन झाले असून याबाबतच्या अपसमजाला विज्ञानाने सिद्ध केले आहे. तरीही स्त्रियांना कौमार्यत्वाची खात्री देण्यासाठी ‘व्हर्जिनिटी कॅप्सूल्स’ या  गोळ्यांचे आमिष जाहिरातींद्वारे दाखविले जात आहे. विवाहानंतर शरीरसंबंध करण्याआधी ही गोळी जननमार्गामधून कृत्रिम रक्तस्रावासाठी  वापरली जाते. या गोळ्यांमुळे योनीमार्गातून रक्तस्राव होत असल्याचे या गोळ्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा रक्तस्राव पूर्णपणे नैसर्गिक भासत असल्याचा दावाही जाहिरातींमधून करण्यात येत आहे.  या गोळ्यांचे

विविध ब्रॅण्ड असून त्यांचे उत्पादन परदेशात केले जाते. या बॅ्रण्डची स्वतंत्र संकेतस्थळेही या कॅप्सूलची जाहिरात करीत आहेत. यातील एका बॅ्रण्डविरोधात तक्रार झाल्यानंतर त्यांच्या गोळ्या ऑनलाइन संकेतस्थळांनी विक्री करणे बंद केले, मात्र इतर ब्रॅण्डच्या गोळ्यांची विक्री अद्याप राजरोस सुरू आहे.

होतेय काय?

कौमार्यभंग झालेले नाही हे सिद्ध करण्यासाठी ‘हायमेनोप्लास्टी’सारख्या शस्त्रक्रियांद्वारे कृत्रिम हायमेन तयार केले जाते. या शस्त्रक्रिया खर्चीक असल्याने स्वस्तातला पर्याय म्हणून ‘व्हर्जिनिटी कॅप्सूल्स’ची जाहिरात केली जात आहे. नामांकित संकेतस्थळांवर साडेतीनशे रुपयांपासून ते अगदी तीन हजार रुपयांपर्यंत किमतीच्या या गोळ्या विकल्या जात असून गोपनीयता बाळगण्यासाठी थेट घरपोच देण्याची व्यवस्था, जवळच्या औषधांच्या दुकानात निनावी पोहोचविण्याची हमी दिली जात आहे.

उघड खोटेपणा..

‘व्हर्जिनिटी कॅप्सूल्स’ ही औषधांच्या व्याख्येत बसत नसून आहारपूरक (डायेटरी सप्लिमेंट्स) आहे आणि अन्न व औषध प्रशासनाने त्यांची चाचणी केलेली नाही, असे या संकेतस्थळांनी थेटपणे जाहीर केले आहे. या गोळीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, यासाठी तुम्हाला डॉक्टरना भेटण्याची आवश्यकता नाही आणि वापरासाठी सहज सोपी असल्याचे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे.

स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे गरजेचे

पहिल्या शरीरसंबंधावेळी रक्तस्राव होणे, ही संकल्पना चुकीची आहे. बऱ्याचदा सायकलिंग किंवा मैदानी खेळ यामुळेही स्त्रियांचे योनीपटल फाटते. त्यामुळे अशा अवैज्ञानिक बाबींबाबत अधिक जागरूकता येणे आवश्यक आहे. त्याही पलीकडे मुळात आजच्या काळात कुमारिका असणे याला अवास्तव महत्त्व देण्याचा समाजाचा कल बदलला पाहिजे. स्त्रीकडे या दृष्टीने पाहण्याची मानसिकताच न बदलल्याने अशी उत्पादने बाजारात दाखल होत आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या गोळ्या अन्न व औषध प्रशासनाने प्रमाणित केलेल्या नाहीत. यामध्ये वापरलेल्या रक्ताच्या पावडरमुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्या जननमार्गावर परिणाम होण्याची भीती असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सांगितले.

मानसिकताच विकृत

कौमार्य भंग झालेले नाही हे सिद्ध करण्यासाठी म्हणून फसव्या मार्गाचा वापर करणे म्हणजे आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करण्यासारखेच आहे. त्यामुळे या गोळ्यांच्या निर्मितीमागची मानसिकताच विकृत आहे. ऑनलाइन संकेतस्थळांवर होणाऱ्या औषधांच्या विक्रीवर कोणतेही बंधन नसल्याने अशी अनेक प्रकारची औषधे सरळसोटपणे विकली जातात आणि यावर अन्न व औषध प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही ही खेदाची बाब असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले.

फसवणूक करणे हा गुन्हाच!

योनीमार्गामध्ये ठेवल्या जाणाऱ्या या गोळ्या एकप्रकारचे औषधच आहे. त्यामुळे अशी औषधे विनापरवाना तयार करून विकणे गुन्हा आहे. यावर कारवाई करणे शक्य आहे. मात्र अशा गोळ्यांबाबत आम्हाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु त्यांचा साठा प्राप्त झाल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive sales of deceptive pills that prove virginity akp
First published on: 20-11-2019 at 02:34 IST