मुंबईत १० एप्रिल अर्थात आजपासून वीकएंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत पूर्ण लॉकडाऊन लागू असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचं पालन व्यवस्थित होत आहे की नाही? याची आज मुंबईत पाहणी केली. यावेळी त्यांनी लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावर देखील टिप्पणी केली. “मुंबईत गळे काढणारे आता सांगतायत की लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात आहेत. पण हॉस्पिटलमध्येच लसीचा शून्य साठा, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असं दाखवत आहेत. ते कसं खोटं होऊ शकतं? इतर राज्यांच्या तुलनेत लस वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. इतर राज्यांमध्ये ६ टक्के, ७ टक्के आहे. त्यामुळे मुंबईकरांना हात जोडून विनंती की या गळे काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या”, असं महापौर किशोरी पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणचं वाढावं तशी लस मिळणार असेल तर…

“ऑफिसमध्ये बसून टीका करणं सोपं आहे. आमच्यासोबत कोविड वॉर्डमध्ये, आयसीयूमध्ये जाऊन बघायला हवं. आघाडी सरकारला बदनाम करायचं, उद्धवजींच्या कामावर बोट ठेवायचं. हल्ली कुणीही उठतंय आणि काहीही करतंय. ज्याचा काडीचाही संबंध नाही अशी लोकं बोलायला लागली आहेत”, असा टोला यावेळी किशोरी पेडणेकर यांनी लगावला. “पानावर बसल्यावर लोणचं वाढतात, तशा आपल्याला लसी देत असतील, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, असं देखील त्या म्हणाल्या.

घरीच थांबा! वीकेंड लॉकडाउनचे हे फोटो पाहिलेत का?

“कुठेही हलगर्जीपणा होत नाही”

महापौरांनी यावेळी रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड यांच्या उपलब्धतेचा देखील आढावा घेतला. “मुंबईकरांची जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे कुठेही प्रशासन म्हणून आम्ही हलगर्जीपणा करत नाही आहोत. लोकांनी साथ देणं गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह आलात, तर कोविड सेंटरमध्ये येऊन अॅडमिट व्हा. जास्त गंभीर असेल, तर आपण खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध करून देऊ. आमच्या वॉररूममधूनच तुम्ही बेड मिळवले पाहिजेत. थेट येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल व्यवस्थापनाने आणि कोविड सेंटरमध्ये देखील अटकाव करावा. व्हेंटिलेटर आणि आयसीयूचे बेड गरजेप्रमाणे रुग्णांना मिळायला हवेत. त्यासाठी नियम पाळायला हवेत”, असं महापौर म्हणाल्या.

More Stories onकरोनाCorona
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor kishori pednekar on lockdown in mumbai vaccine supply for maharashtra pmw
First published on: 10-04-2021 at 13:26 IST