कल्याण: भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करता विरोधी गटातील उमेदवाराला मतदान केले होते. या नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडी स्वतंत्र गट स्थापन केला होता. बंडखोरीमुळे या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी दोन वर्षापूर्वी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यांनंतर विभागीय आयुक्तांनी १८ नगरसेवकांच्या बाजुने निकाल दिल्याने त्यांची नगरसेवक पदे कायम राहिली आहेत.

१८ नगरसेवकांची पदे कायम राहिल्याची माहिती उपमहापौर इम्रानवली खान यांनी दिली. भिवंडी पालिकेत काँग्रेसचे ४७ नगरसेवक आहेत. ५ डिसेंबर २०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून ऋषिका राका यांच्या नावाची घोषणा केली. पक्षातील १८ नगरसेवकांनी या नावाला नापसंती दर्शवून बंडखोरी करुन वेगळा गट स्थापन केला. महापौर रिंगणातील स्पर्धक उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केले. जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १८ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी तक्रार केली.