शहराच्या विकासासाठी पुढील १० वर्षांत महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या ७० हजार कोटींच्या योजनांचे सादरीकरण महापौर सुनील प्रभू यांनी चौदाव्या वित्त आयोगासमोर शुक्रवारी केले. यातील आवश्यक वाटत असलेल्या प्रकल्पांना आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी आयोगाकडे केली.
शहरे तसेच जिल्ह्य़ांमधील विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या विकासाचा पुढील दहा वर्षांचा आराखडा या वेळी सुनील प्रभू यांनी मांडला. नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी आणि किनारी मार्गासाठी प्रत्येकी साडेपाच हजार कोटी रुपये तर रस्त्यांखाली उपयोगिता सेवा वाहिन्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी पुढील १० वर्षांत १० हजार कोटी रुपये खर्च होतील. घनकचरा व्यवस्थापनासाठी १,६०० कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित आहेत. आरोग्य सेवेसाठी सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या योजना महापौरांनी सादर केल्या. मुलुंड येथे रुग्णालय, पूर्व-पश्चिम उपनगरात वैद्यकीय महाविद्यालय, पूर्व उपनगरात ट्रॉमा रुग्णालय, मेट्रो रक्तपेढी यांचा त्यात समावेश आहे.