राज्यातील गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाच्या सूचनेनुसार मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र बांधकाम स्थळी व पुलाखाली वास्तव्यास असलेल्या मुलांचे लसीकरण होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मुलांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी २४ डिसेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सात दिवसांमध्ये २२७ बालकांना गाेवर रुबेलाची लस देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>मुंबई: चांदिवली पुलाजवळ जलवाहिनी फुटली; मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय
बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती सतत कामानिमित्त फिरत असतात. तसेच बहुतांश कर्मचारी, कामगार उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील आहेत. परिणामी, त्यांच्या मुलांचे लसीकरण होत नाही. ही बाब लक्षात घेऊन गोवर रुबेला लसीकरणापासून एकही बाळ वंचित राहू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने २४ डिसेंबरपासून बांधकाम स्थळी आणि पुलाखाली वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी मोबाइल लसीकरण सत्र सुरू केले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये मोबाइल लसीकरण सत्रांतर्गत मुंबई महानगरपालिकेने बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या ७६ बालकांना एम.आर.सी.व्ही.- १ ची मात्रा, तर ३३ मुलांना एम.आर.सी.व्ही. – २ ची मात्र दिली. त्याचप्रमाणे पुलाखाली राहणाऱ्या ८४ मुलांना एम आर सी व्ही १ ची मात्रा, तर ३४ मुलांना एम आर सी व्ही २ ची मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एम.आर.सी.व्ही. – १ आणि एम.आर.सी.व्ही. – २ ची मात्रा देण्यात येणाऱ्या सर्व बालकांना जीवनसत्त्व ‘अ’ची मात्राही देण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.