मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां निवासस्थानी कोकणातील शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेत स्थानिक पातळीवरील प्रश्न, प्रलंबित कामे जाणून घेतली आणि ती कामे वेगात मार्गी लावण्याचा आदेश प्रशासनाला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां निवासस्थानी कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, भिवंडी, पालघर येथील स्थानिक परिस्थितीची माहिती या लोकप्रतिनिधींकडून घेतली. या बैठकीला मुंबईसह कोकणातील १४ आमदारांसह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते. रस्ते, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा तसेच पर्यटनाच्या सुविधा याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. कोकणातील विकासात्मक कामांचा आढावा घेत, विकास प्रकल्प तसेच स्थानिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मते जाणून घेतली.  विकासकामे वेगाने मार्गी लावण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.