मेहबूबा मुफ्ती यांची सूचना; मोदींनी भ्रमनिरास केल्याची भावना

काश्मिरी जनतेला विश्वासात न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जनतेचा भ्रमनिरास केला, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी मुंबईत ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना केला. काश्मीर खोऱ्यातील देशाच्या सीमा प्रायोगिक तत्त्वावर मर्यादित खुल्या करून शेजारी देशांशी मुक्त आर्थिक, व्यापारी व सामाजिक संबंध ठेवून काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

आपल्याला १९४७ पर्यंत मागे जाता येणार नाही आणि काश्मिरी जनतेला भारतातच राहायचे आहे. देशाची एकता, अखंडता कायम ठेवून व सुरक्षेशी तडजोड न करता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गाचे अनुसरण करून परस्परसौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, आशियाई देशांशी संबंध ठेवताना जम्मू व काश्मीर हे प्रमुख केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

मोदींएवढे प्रचंड बहुमत पाठीशी नसताना वाजपेयी यांनी सीमा खुल्या करून लाहोपर्यंत बसयात्रा केली, तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला व त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला. वाजपेयी व तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या प्रयत्नांमुळे काश्मिरी जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन २००२-०५ या काळात हिंसाचार, अतिरेकी कारवाया, घुसखोरी, सुरक्षा दलांवरील हल्ले यांचे प्रमाण खूप कमी झाले; पण नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात वातावरण बिघडले. मोदी यांच्या पाठीशी बहुमत असूनही त्यांनी काश्मिरी जनतेला कोणताही संदेश व विश्वास दिला नाही. सीमाभागातील रस्ते खुले करून व्यापार व पाकव्याप्त काश्मीरमध्ये सौहार्दाचे संबंध ठेवले व अगदी चीनबरोबरही तेच धोरण ठेवले, तर संपूर्ण आशियायी देशांमध्ये चांगले वातावरण तयार होईल, असे मत पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. काश्मीर प्रश्न सुटावा, यासाठी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) हिताची काळजी न करता आम्ही भाजपशी हातमिळवणी केली. पंतप्रधान मोदी यांना वाजपेयींप्रमाणेच काश्मीर खोऱ्यात आमंत्रित केले, असेही त्या म्हणाल्या.

काश्मिरी पंडितांनी खोऱ्यात परतावे

काश्मिरी पंडित खोऱ्यातून निघून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी मायभूमीत परतावे, अशी अपेक्षा मुफ्ती यांनी व्यक्त केली. पाकिस्तानशी चर्चा अपरिहार्यच आहे, पण तसे म्हटले की लगेच भारतविरोधी असल्याची टिप्पणी होते, असे सांगून मुफ्ती म्हणाल्या, काश्मिरी जनतेला भारतातच राहायचे आहे; पण अतिरेकी गटांमध्ये सामील झालेले कोवळे तरुण सुरक्षा दलांकडून मारले जात आहेत. हे देशातीलच तरुण आहेत. नागरी भागातील सुरक्षा दले मागे घेऊन काश्मिरी जनतेच्या मनातील सल काढण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.