मुंबई : मुसळधार पावसामुळे लोकल उशिराने धावत असतानाच बुधवारी सायंकाळी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, कसारा मुख्य मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्यास एक मनोरुग्ण कारण ठरला. सीएसएमटी स्थानकात तो खांबावर चढला

होता. त्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांना तब्बल २० मिनिटे कसरत करावी लागली. यासाठी ‘ओव्हरहेड वायर’चा विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागला. सायंकाळी सव्वा पाचनंतर घडलेल्या या नाटय़ामुळे लोकलचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाले. 

सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी एक २८ वर्षीय तरुण सीएसएमटी येथील अप जलद लोकल फलाटाच्या अखेरीस असलेल्या एका खांबावर चढला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यानी या तरुणाबरोबर संवाद साधला. मात्र तो ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हता. या खांबाजवळून ‘ओव्हरहेड वायर’ जात असल्याने त्याचा विजेचा धक्का लागण्याची भीती होती. अखेर त्याला खाली उतरवण्यासाठी मध्य रेल्वेला सीएसएमटी स्थानकातील जलद आणि धीम्या मार्गावरील ‘ओव्हरहेड वायर’चा विद्युत पुरवठा तब्बल २० मिनिटे बंद करावा लागला.  त्यामुळे जलद आणि धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले.  

सीएसएमटी स्थानकातही लोकल १५ मिनिटे उशिराने येत असल्याची उद्घोषणा होत होती. यासंदर्भात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.