आपल्या मावशीच्या घरी निघालेल्या एका ३२ वर्षीय गतिमंद तरुणीवर पत्ता दाखवण्याच्या बहाण्याने साधुल्ला मोहम्मद शफी सर्जीकर या तरुणाने बलात्कार केला. ग्रँट रोड येथे राहणारी ही तरुणी बुधवारी मावशीकडे निघाली असता रस्ता चुकली. साधुल्लाने पत्ता दाखवतो असे सांगून नागपाडा येथील लॉजवर नेले आणि बलात्कार केला. त्याला पोलिसांनी अटक केली.
पीडित तरुणी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ग्रँट रोड येथेच राहणाऱ्या आपल्या मावशीकडे जाण्यास निघाली होती. त्यावेळी ती रस्ता चुकली. तिने रस्त्यावरून जाणाऱ्या साधुल्लाला पत्ता विचारला. ही तरुणी गतिमंद असल्याचे लक्षात येताच त्याने तिला नागपाडा येथे नेले. येथील फिरदोस लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर ती तरुणी कशीबशी आपल्या घरी आली आणि कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच साधुल्लाला अटक केली. या लॉजच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त निस्सार तांबोळी यांनी सांगितले.