scorecardresearch

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ दुसरा टप्पा जानेवारीतच वाहतूक सेवेत – महानगर आयुक्त

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ दुसरा टप्पा जानेवारीमध्येत वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मानस असल्याचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ दुसरा टप्पा जानेवारीतच वाहतूक सेवेत – महानगर आयुक्त
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ या मार्गिकांना दुसऱ्या टप्प्यात सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या मार्गिका नेमक्या कधी सेवेत दाखल होणार याबाबत अस्पष्टता आहे. दरम्यान, हा टप्पा जानेवारीमध्येत वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मानस असल्याचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल आणि ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ पूर्णतः सेवेत दाखल होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर – डहाणूकरवाडी – आरे असा २० किमीचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये आरे – डी. एन. नगर आणि आरे – अंधेरी असा दुसरा टप्पा सुरू होईल, असे त्यावेळी एमएमआरडीएने जाहीर केले होते. मात्र, यादरम्यान काम पूर्ण न झाल्याने ही वेळ चुकली. पुढे डिसेंबर २०२२ अखेरीस हा टप्पा सुरू होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण काम पूर्ण होण्याची चिन्हे नसल्याने या मार्गिका जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होतील, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – बेस्टच्या दुप्पट अनामत रक्कम वसुलीला राजकीय पक्षांचा विरोध, शिवडीत ठिकठिकाणी शिवसेनेचे आज आंदोलन

दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून तांत्रिक कामेही मार्गी लागली आहेत. मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचणीही झाली आहे. आता केवळ त्यांच्या सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. मात्र, ही प्रतीक्षा काही संपलेली नाही. या प्रमाणपत्राअभावी दुसरा टप्पा सुरू होऊ शकलेला नाही. परिणामी, प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगर आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांना विचारले असता त्यांनी जानेवारीतच दुसरा टप्पा सुरू, होईल असा दावा केला. त्यामुळे जानेवारी अखेरपासून मुंबईकरांना दहिसर – अंधेरी असा थेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 12:50 IST

संबंधित बातम्या