scorecardresearch

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ लवकरच सेवेत

दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो २ अ’ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून आता केवळ मेट्रो रुळांची सुरक्षा चाचणी शिल्लक आहे.

गाडय़ांची सुरक्षा चाचणी पूर्ण, रुळांच्या चाचणीची प्रतीक्षा

मुंबई :  दहिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो २ अ’ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून आता केवळ मेट्रो रुळांची सुरक्षा चाचणी शिल्लक आहे. या चाचणीअंती आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो सेवा कार्यरत होतील. करोना, टाळेबंदीसह तांत्रिक अडचणींमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांची कामे वर्षभर रखडली.  पण मागील वर्षभरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाला वेग दिला आहे. संपूर्ण मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असून या मार्गिका दोन टप्प्यांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यातील केवळ एकच टप्पा राहिला असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

या दोन्ही मार्गिकेसाठी जानेवारीत ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) दर्जाविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र दोन टप्प्यांत मिळते. त्यानुसार मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आता केवळ रुळांची चाचणी शिल्लक आहे. यासाठी सीएमआरएसकडे शुक्रवारी अर्ज करण्यात आला आहे. ही प्रक्रिया ही लवकरच पूर्ण होणार असून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मार्चमध्ये दोन्ही मार्गातील पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी सिग्नल चाचणी पूर्ण झाली असून रेल्वे मंत्रालयाची परवानगीही मिळाली आहे. तर आवश्यक असे फ्रांसचे एक प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. एकूणच आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचीच एमएमआरडीएला प्रतीक्षा आहे.

१० मेट्रो गाडय़ा आणि मनुष्यबळ सज्ज

 ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण १० मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाडय़ांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाडय़ांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाडय़ा प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Metro 2a metro 7 service soon vehicle safety test completed ysh

ताज्या बातम्या