मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ७ एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार असून ८ एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय

एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे -ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत. देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार मंगळवार, १ एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.

एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार १ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. काही तांत्रिक कारणांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करावा, असे आवाहनही एमएमआरसीने एका जाहीर निवेदनाद्वारे केले आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी १’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यांना पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करावा लागणार आहे.

देखभालीसाठी प्रवेशद्वार बंद

तांत्रिक कारणांसाठी प्रवेशद्वार बंद करण्यात येत असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देखभालीच्या कामासाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ८ एप्रिलपासून ‘बी १’ प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले होईल असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरे – बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे वा सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

रमजान ईदच्या दिवशी ३१ मार्चला मेट्रोच्या वेळेत बदल करून मेट्रोची सेवा सकाळी ६.३० ऐवजी सकाळी ८.३० वाजता सुरू करण्यात आली. यासाठी संचलनाच्या नियोजनाच्या कामाचे कारण पुढे करण्यात आले. याआधीही एकदा मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला होता. त्याचवेळी काही मेट्रो स्थानकांवरील प्रवेशद्वार देखभालीसाठी बंद ठेवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे मरोळ मेट्रो स्थानकातील ‘बी २’ प्रवेशद्वार देखभालीसाठी बंद असून हे प्रवेशद्वार बुधवारी, २ एप्रिलपर्यंत बंदच असणार आहे. त्यात आता विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार आठवड्याभरासाठी बंद असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.