कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंधेरी मेट्रो-३ प्रकल्प संपूर्ण शहराचा विचार करून आखण्यात आला असून विविध प्रकारच्या सर्वेक्षणाअंती मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मेट्रो-३’च्या मार्गात बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रहिवाशांचे मूळ इमारतीच्या ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने घेतली आहे.
गिरगावमधील दाटीवाटीच्या वस्तीतून ‘मेट्रो-३’ धावणार आहे. मुंबई सेंट्रल ते मेट्रो दरम्यान १०० वर्षांहून अधिक जुन्या इमारती उभ्या आहेत. ‘मेट्रो-३ ची गिरगावकरांना धडक’ असे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गिरगावकरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना पत्र पाठवून त्यांचे म्हणणे एकून घेण्यासाठी एमएमआरसीने नरिमन पॉइंट येथील कार्यालयात सोमवारपासून बैठका आयोजित केल्या आहेत. चिराबाजार परिसरातील रहिवाशांनी सोमवारच्या बैठकीत या प्रकल्पाला कडाडून विरोध केला.
एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत ठाकूरद्वार परिसरातील रहिवाशांनी ‘मेट्रो-३’लाच विरोध दर्शविला. गिरगावकरांना पश्चिम आणि मध्य रेल्वे जवळ आहे. त्याशिवाय बेस्टची बसही उपलब्ध आहेत. त्यामुळे या परिसरात ‘मेट्रो-३’ची गरज नाही. भेंडीबाजर परिसरातील रहिवाशांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळे तो भेंडीबाजारात राबवावा अन्यथा कमी लोकवस्तीच्या महर्षी कर्वे मार्गाचा विचार करावा, अशी सूचना काही रहिवाशांनी यावेळी केली. ‘मेट्रो-३’ याच मार्गावरून न्यायची असल्यास आमचे पुनर्वसन गिरगावातच करावे लागेल, कोणत्याही परिस्थितीत म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जाणार नाही, असेही रहिवाशांनी एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
‘मेट्रो-३’चा मार्ग सर्वेक्षणाअंती निश्चित करण्यात आला आहे. मेट्रो ठराविक कोनातच वळू शकते. त्यामुळे त्याचा मार्ग बदलणे शक्यच नाही. मात्र मेट्रोमुळे तुटणाऱ्या इमारतींचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा आमचा विचार आहे. त्याबाबत अभ्यास सुरू आहे. पुनर्वसनासाठी रहिवाशांनीही सूचना कराव्यात. सर्व गोष्टींचा अभ्यास आणि रहिवाशांचे समाधान झाल्यानंतरच इमारती ताब्यात घेण्याची कारवाई होईल, असे आश्वासन एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिले.
या परिसरात पुनर्वसनाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. ‘मेट्रो-३’च्या निमित्ताने त्यांना चालना मिळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र गिरगाव कायमचाच सोडावा लागेल या भीतीने रहिवाशांनी या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट करून एमएमआरसीने भाडेकरूचे नाव, पत्ता, घराचे क्षेत्रफळ आदी माहिती घेण्यासाठी दिलेला अर्ज भरण्यास या रहिवाशांनी स्पष्ट नकार दिला. रहिवाशांचे मूळ ठिकाणीच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे एमएमआरसीकडून सांगण्यात येत आहे. परंतु  लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिला आहे.

‘मेट्रो’मुळे २६ इमारती बाधित होणार
भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे गिरगाव-काळबादेवी भागातील शेकडो इमारती बाधित होणार असल्याचा समज चुकीचा आहे. मेट्रोच्या गिरगाव व काळबादेवी या दोन्ही स्थानकांसाठी एकूण २६ इमारती बाधित होणार आहेत. त्यात काळबादेवीतील १८ व गिरगावातील ८ इमारतींचा समावेश आहे. या २६ इमारतींमधील ७३७ कुटुंबे बाधित होणार आहेत. मेट्रोसाठी जागेची गरज भागल्यानंतर त्याच परिसरात या इमारतींची पुनर्बाधणी होऊ शकते काय? याची पडताळणी केली जाईल व शक्य असल्यास त्याच जागेवर रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राहील, असे ‘एमएमआरसी’तर्फे सांगण्यात आले आहे. काळबादेवीमधील नर्मदाबाई ट्रस्ट, कोटकर बिल्डिंग १७ आणि १८, सबिना हाऊस, तोडीवाला बिल्डिंग, मुन्नालाल मेन्शन अ व ब, सोना चेंबर, मच्छी बाजार, वर्न व्हिला, छत्रीवाला बिल्डिंग, खान हाऊस बिल्डिंग क्रमांक ५९१, ५९३, ५९५ राजशीला, कपाडिया चेंबर, चीरा बाजार क्रमांक ६०५ व ६०७ आणि सिंगापूर बिल्डिंग या इमारती बाधित होणार आहेत. तर विठ्ठलदास बिल्डिंग, व्हीआयपी लगेज शॉप, श्रीराम भवन, स्वामी निवास, पदपथावरील दुकाने, अन्नपूर्णा बिल्डिंग, खंती नगर, एकता नगर, धूत पापेश्वर या गिरगावमधील इमारती-आस्थापने बाधित होणार आहेत.