जुहू येथील मोक्याचा भूखंड अल्पदरात मिळवून त्यावर आपले ‘गृहस्वप्न’ पूर्ण करून घेणाऱ्या म्हाडा उच्चपदस्थांनी जादा चटई क्षेत्रफळ घेतल्याप्रकरणातील घोटाळा उघड होऊन सहा वर्षे उलटली तरी अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. विधिमंडळाकडून नेमल्या गेलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीने घोटाळा झाल्याचे मान्य केल्यानंतर गृहनिर्माण विभागाकडून कृती अहवाल सादर केला गेला. तरीही प्रत्यक्षात काहीही कारवाई न होता, ही फाइलच आता बंद करण्यात आल्याचे कळते. या सोसायटीने जादा एफएसआय घेतल्याबद्दल कारवाई करणे दूरच; पण या सोसायटीला दिलेल्या चटई क्षेत्रफळाच्या दरातील फरकापोटी व्याजासह अडीच कोटी रुपयेही सोसायटीने अद्याप भरलेले नसतानाही ‘म्हाडा’ने कारवाई केलेली नाही.  
‘गृहस्वप्न’ या उच्च उत्पन्न गटातील सोसायटीला पुनर्वकिास करण्यासाठी एक एफएसआय आणि एक टीडीआर उपलब्ध होऊ शकला असता; परंतु या सोसायटीने ०.४ जादा म्हणजे २.४ इतका एफएसआय घेतला. हा एफएसआय घेण्यासाठी गृहस्वप्न ही सोसायटी विकास नियंत्रण नियमावलीच्या कलम ३३ (५) मध्ये मोडते, असे दाखवितानाही कागदपत्रांमध्ये चापलुसी करण्यात आली. ‘रिचा रिअल्टर्स’ या विकासकाने हे बांधकाम केले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त सनदी अधिकारी बी. के. अग्रवाल यांच्या समितीने अतिरिक्त एफएसआयचा घोटाळा झाल्याचे मान्य केले. हा अहवाल शासनाने स्वीकारून गृहनिर्माण विभागाला कृती अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तत्कालीन सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या कृती अहवालात या तसेच अन्य १३ सोसायटय़ांकडील एफएसआय काढून घेण्याची शिफारस ऑगस्ट २००८ मध्ये नगरविकास खात्याकडे केली. मात्र त्याआधीच, ११ फेब्रुवारी २००८ मध्ये नगरविकास खात्याने सोसायटीच्या पुनर्विकासाला मंजुरी देऊन टाकली.