दोन वर्षांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत रखडली असली तरी आता शहराजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी मुंबई-ठाणेकरांना मिळणार आहे. कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची घोषणा उद्या तीन वाजता होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ही घोषणा करतील. उद्या घोषणा केल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत निघाली होती. त्यानंतर सर्वसामान्य नागरिक सोडतीच्या प्रतीक्षेतच होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी निघणार

कोकण मंडळातील सुमारे नऊ हजार हजार घरांसाठी दसऱ्यादरम्यान सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असेही त्यांनी सांगितले.

कोकण मंडळाच्या सोडतीची घोषणा याआधीही काही महिन्यांपूर्वी झाली होती. मात्र, काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे ही सोडत रखडली होती. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीत ३०० ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती १२ ते ५६ लाख रुपयांदरम्यान असतील.