कोकणात ८,२०५ घरे; मुंबईतील पाच हजार घरेही लवकरच विक्रीस : गृहनिर्माणमंत्री

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या(म्हाडा) कोकण मंडळामार्फत बांधण्यात येत असलेल्या ८ हजार २०५ सदनिकांसाठी येत्या १४ ऑक्टोेबरला सोडत काढण्यात येणार आहे. यातील ९७ टक्के  घरे अत्यल्प व अल्प गटातील लोकांसाठी राखीव असून सोडतीची जाहिरात २३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दिली. त्याचप्रमाणे येत्या काही महिन्यात मुंबईत पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून विभागीय आयुक्तालयांच्या शहरात १० हजार घरांची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील शिरढोण (६२४), खोणी (२६००), भंडार्ली (१७६९), गोठेघर (११८५) अशी घरे असून मीरारोड येथे २११ असून पालघर जिल्ह्यातील विरार बोळिंज (१७१३) व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ३ घरे आहेत. या घरांसाठी अर्जाची किंमत ५६० रुपये असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये इतकी असेल. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्न मर्यादा २५ हजार रुपये पर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपये पेक्षा जास्त अशी असेल. संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठित असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोडतीमध्ये अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली.

राज्यभरात आणखी १० हजार घरांची निर्मिती तसेच मुंबईतही याच वर्षी पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून त्याची घोषणा लवकरच केली जाईल. तसेच राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता म्हाडातर्फे नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये १० हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही आव्हाड यांनी दिली.

राज्यातील जनतेला जास्तीत जास्त घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने, त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते.

राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता म्हाडातर्फे नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये १० हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील. – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री